विविध मागण्यांसाठी परिचारिकांचे आंदोलन
चंद्रपूर,
परिचारिकांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे. या अनुषंगाने सोमवार, 21 जून रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांनी एकत्र येत शासकीय रुग्णालयासमोर निदर्शने केली.
कोरोना जागतिक महामारीच्या काळात सर्व परिचारिका स्वत:च्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देत आहे. मात्र, त्यांना अपुरा कर्मचारी वर्ग, वेतनातील तफावत, कोरोना भत्ता न मिळणे यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, सातव्या वेतन आयोगाची त्रुटी दूर करून थकबाकी लवकरात लवकर जमा करावी, जुनी पेंशन योजना लागू करावी, आदी मागण्यांना घेऊन आंदोलन पुकारण्यात आले आहे. या अंतर्गत 22 जून रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत कामबंद आंदोलन व 23 जूनपासून पूर्णवेळ कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनचे अध्यक्ष अक्षय डहाळे यांनी केले. आंदोलनात शासकीय रुग्णालयातील परिचारिका संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कोरडे, सचिव संजय विश्वास, विशाल बनकर, तौफिक खैराटे, सुहास भिसे, स्वस्तिक मुळे, मंजुश्री घाटे, वैशाली तपासे आदी सहभागी झाले होते.