राज्यापुढे ज्वलंत प्रश्नांचा डोंगर असतांना दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ही लोकशाहीची शोकांतिका
– अँड. वामनराव चटप
चंद्रपूर, दिनांक 24 जून –
महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावासह मोठ्या प्रमाणात अनेक नैसर्गिक संकटे आली असून अनेक ज्वलंत समस्या, प्रश्न आ वासून उभे असतांना राज्य सरकारने या अधिवेशनात महत्वाचे व जनतेच्या जीवनमरणाचे निर्णय घेणे अपेक्षित असतांना राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसापर्यंत मर्यादित केले आहे. ही लोकशाहीची शोकांतिका असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी केली आहे.
राज्यात महामारी व लॉकडाऊन मुळे संपूर्ण जनता हवालदिल झाली असून विविध संकटांचा सामना करीत आहे. आधीच राज्याची आर्थिक स्थिती कमी महसूल प्राप्त होत असल्याने आणि राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याने दयनीय झाली आहे. म्हणुन मागील वर्षी आणि याही वर्षी अर्थसंकल्पात 67 टक्के कपात करावी लागली आहे. शेतकर्यांचा शेतीचा हंगाम सुरू असून त्यांना खत, बियाणे यांचा पुरवठा काही भागात योग्य होत नाही. अनेक उद्योगांनी कामगारांना कामावरून काढून टाकल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदारी कामगारांचा प्रश्न अधिक बिकट बनला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. बेरोजगार युवकांना अर्थार्जनाचा मार्ग नसल्याने ते निराश होत आहेत. राज्यात डॉक्टर्स, नर्सेस यांचेसह वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कोरोना योद्धा सतत कार्यरत असतांना त्यांच्याही काही समस्या निर्माण झाल्या आहेत. व्यापारी, छोटे व्यावसायिक हे लॉकडाऊन मुळे पुरते कोलमडून गेले आहेत.
अशा सर्व परिस्थितीत विधानसभेत चर्चा होऊन या सर्व लोकांना धीर देण्यासाठी, त्यांचे सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी आणि पुढे येणार्या कोरोनाच्या नवीन व्हेरीयंट चा सामना करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र औपचारीकता म्हणुन केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेणे म्हणजे ज्या मतदार राजानी या प्रतिनिधींना सभागृहात निवडून पाठविले, त्यांची प्रतारणा करणे आहे, अशी घणाघाती टीका माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी केली आहे.