विश्व भारत ऑनलाईन :
संत्रानगरीतील ऐतिहासिक मस्कऱ्या बाप्पांचे मंगळवारी आगमन होणार आहे. यंदा या गणपतीला 235 वर्षे पूर्ण होत आहेत. इ. स. 1787 मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते.
सुरुवात कशी झाली…
श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांनी 1787 मध्ये सुरू केलेल्या हाडपक्या म्हणजेच मस्कऱ्या गणपतीची परंपरा आजही सुरू असून मंगळवार, 13 रोजी या गणेशाची स्थापना होणार आहे. समशेर बहादर चिमणाबापू बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून परत येत असताना घरच्या कुळाचारी गणपतीचे विसर्जन होऊन गेले होते. बंगालच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून या मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आली होती.यात विविध नकला, लावण्या, खडी गंमत सारखे कार्यक्रम आयोजित केले जात. कालांतराने लोकमान्य टिळकांनी भोसले महाराजांच्या या घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले.
21 फुटांची असेल मूर्ती
उत्सवाला 200 वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांनी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणे सुरू केले. यावर्षी उत्सवाला 235 वर्ष पूर्ण होत आहे. काही वर्षांपर्यत 12 हातांची 21 फूटांची मूर्ती स्थापन करण्यात येत होती. यावर्षीही 12 हातांची 21 फूटांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे.
नवसाला पावणारा
श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्कऱ्या (हाडपक्या) गणपतीची सुरू केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे. श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात. हा नवसाला पावणारा गणपती आहे. आजही भक्तांना प्रचिती येते, असा दावा राजवाड्याकडून करण्यात येतो.
मार्गक्रमण
गणपतीची आगमन मिरवणूक 12 रोजी 4 वाजता चितार ओळी (भावसार चौक) येथून मार्गक्रमण करून गांधी पुतळा सि. ए. रोड, बडकस चौक, केळीबाग रोड, कोतवाली पोलिस स्टेशन चौक, नरसिंग टॉकिज चौक, सिनीयर भोसला पॅलेसमार्गे राजवाड्यात येईल. नागरिकांनी गणेशोत्सवात सहभागी व्हावे,असे आवाहन केले आहे.