विश्व भारत ऑनलाईन :
औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर या गावातून शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राज्याच्या उद्योग मंत्रालयातील निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (६०) यांचे 4 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस पथकाने बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपावर रात्री ९ वाजेच्या सुमारास राजळे यांची सुटका करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विकास भगवान खरात(२२), पांडुरंग विष्णू पडूळ(२२), रोहित दीपक भागवत(१८), बबनराव वाघ (४४), राहुल बबन गुंजकर(२९), दीपक भागवत (४४) अशी आरोपींची नावे आहेत.
असे केले अपहरण
निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे हे सिडकोत राहतात. त्यांनी छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या पूर्वेस इब्राहिमपूर शिवारात जमीन घेतली आहे. शनिवारी दुपारी ते सालदार दीपक भागवतसोबत काम उरकून फार्म हाऊसवर आले. तेवढ्यात येऊन अज्ञात सहा आरोपींनी राजळे यांना मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून कारमध्ये बसवून अपहरण केले. कार धुळे-सोलापूर मार्गे व नंतर कच्च्या रस्त्याने जालना रोडकडे रवाना झाली. सागर राजळे यांना अपहरणकर्त्यांचा फोन येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.