विश्व भारत ऑनलाईन :
नागपुरातील जामठा विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) स्टेडियमवर शुक्रवारी, 23 सप्टेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सामना होणार आहे. सामना संपल्यानंतर शहरात येणाऱ्यांकडून वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी जामठा ते रहाटे कॉलनीपर्यंत वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला आहे. या दरम्यान प्रेक्षकांव्यतिरिक्त रस्त्यावरची वाहतूक इतरत्र वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे बुधवारी चार्टड विमानाने शहरात आगमन झाले.रेडिसन ब्लू आणि ली मेरिडियन या हॉटेलमध्ये दोन्ही संघातील खेळाडू थांबतील. या दोन्ही हॉटेलमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. 21 ते 24 सप्टेंबर असा मुक्काम दोन्ही संघाचा नागपुरात असेल. मैदानावरील सराव आणि सामन्यांमध्ये संघासोबत पोलिसांची टीम बंदोबस्तात राहील. मागील सामन्याचा अनुभव लक्षात घेता यंदा पार्किंगच्या जागेचे नियोजन केले आहे.
लोकांना खूप लांबून ‘यू टर्न’ घ्यावे लागत होते. त्यामुळे यंदा दोन ठिकाणांचे रस्ता दुभाजक काढण्यात येतील. जामठा मैदानावर एकूण 13 गेट आहेत. गेट एक वर खासगी सुरक्षा रक्षकांसह पोलीसांची सुद्धा कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कंट्रोलच्या ठिकाणी जामठा आणि आमची टीम मिळून पाहणी करून नियंत्रण ठेवणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. बंदोबस्ताचे शुल्क म्हणून 50 लाख रुपये मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वाहतूक कोंडी होणार कमी
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना असला की, हमखास वर्धा रोडवर ट्रॉफिक जॅमची स्थिती असते. मात्र सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांनी विविध मार्गाचा पर्याय निवडून व वाहतुकीच्या नियमाचे तंतोतंत पालन केल्यास वाहतुकीची कोंडी निश्चितच कमी होऊ शकते. प्रेक्षकांनी वाहने शेअर करण्यासोबतच सामन्यासाठी घरून थोडे लवकर निघावे लागेल. शिवाय विविध मार्गाने स्टेडियमकडे जाताना वर्धा रोडवर गर्दी न करता मानेवाडा, मनीषनगर व अन्य पर्यायी मार्गाचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर कमी होईलच, शिवाय संभाव्य दुर्घटनादेखील टाळता येतील.
असा पोलिस बंदोबस्त
*7 पोलिस उपायुक्त, 10 सहायक पोलिस आयुक्त
*35 पोलिस निरीक्षक, 4 मोबाईल सर्विलन्स व्हॅन
*138 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक
*1600 पुरुष कर्मचारी व 400 महिला कर्मचारी
400 वाहतूक पोलिस कर्मचारी, स्पेशल क्यूआरटी पथक
*मॅच फिक्सिंग व जुगारावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक