विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर मेट्रोचा कायापालट करणाऱ्या महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्लीत भेट घेत औरंगाबाद शहराच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अहवालासंबंधी सविस्तर माहिती घेतली.
विशेष म्हणजे महामेट्रोला औरंगाबाद शहराकरिता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे कार्य देण्यात आले.
नागपूरच्या धर्तीवर…
डॉ. दीक्षित यांनी प्रस्तावित डीपीआरच्या स्थितीबाबत डॉ. कराड यांना सादरीकरण केले. महामेट्रोने नागपूर आणि पुणे या ठिकाणी यशस्वीरीत्या प्रकल्प राबवला असून नाशिक, ठाणे आणि वारंगल (तेलंगण राज्य) या शहरांकरिता याच प्रकारचा अहवाल तयार केला असून आता औरंगाबाद शहराकरता मेट्रो रेल प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे.
औरंगाबाद येथे डबल डेकर उड्डाणपूल नागपूर शहराप्रमाणे तयार करण्यात येणार आहे. महा मेट्रोने वर्धा मार्गावर बहुस्तरीय वाहतूक प्रकल्प कार्यान्वित केला असून कामठी मार्गावर निर्माण कार्य सुरू आहे. वर्धा मार्गावर तीनस्तरीय वाहतूक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून सर्वात खाली रस्ता, त्याच्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो मार्गिका आहे. कामठी मार्गावर ४ स्तरीय प्रकल्प महा मेट्रोद्वारे राबवण्यात येत आहे. गड्डीगोदाम येथे चारस्तरीय वाहतूक संरचनाचा समावेश आहे. यात पहिले दोन स्तर म्हणून विद्यमान रस्ता आणि रेल्वे ट्रॅक आहे, त्यानंतर उड्डाणपूल आणि २४ मीटर उंचीवर मेट्रो मार्ग आहे.