विश्व भारत ऑनलाईन :
“वकिली व्यवसायात कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान मोठे आहे. तरुण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यवसायात सुरूवातीला अनेक अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा”, असा सल्ला सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला.
महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या राज्यस्तरीय वकील परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
या वेळी सरन्यायाधीश लळित म्हणाले, “सोलापूर ही माझी जन्मभूमी आहे. याठिकाणी माझे शालेय शिक्षण झाले. जन्मगावाचे ऋणानुबंध कायम आहेत. येथील मित्र, वर्गमित्र यांच्याशी आजही संपर्कात आहे. मी ३९ वर्षे वकिली व्यवसायात आहे. मला वकिली व्यवसातून उदंड किर्ती, मान, पैसा सर्व मिळाले. आता सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी जे आहे ते परत करायचे आहे. वकिलांनी मूल्यांची शिदोरी घेऊन स्वत:वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे, अडथळे पार होतील.”
देशातील आज निम्म्याहून अधिक लाेकसंख्या तरुण आहे. येणार्या काळात युवकांच्या हातात देश असेल. ग्रंथालय आणि पुस्तकांचा आधार घेवूनच आम्ही शिखर गाठले. सध्या इंटरनेटच्या जमान्यात तुम्हाला संशोधन, अभ्यासासाठी प्रचंड साधने आहेत. युट्यूबसुद्धा तुम्हाला वकिलांचा युक्तीवाद पाहायला मिळेल, सदैव सचोटीने काम करा, कक्षा भव्य आहेत, असेही ते म्हणाले.