विश्व भारत ऑनलाईन :
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसशी नाते सांगत होते. मग त्यांनी शिवसेना, मनसेची साथ घेतली.आता त्यांची शिंदेसेनेशी जवळीक वाढल्याचे दिसते.उद्योगमंत्री उदय सामंत यांना ते मुंबईत जाऊन भेटल्याने कन्नड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यांचे समर्थक जाधव यांनी शिंदेसेनेत जावे, असे म्हणत असले तरी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि जाधव यांच्यामधील द्वेष लक्षात घेता असा प्रवेश पाहिजे तसा सोपा नाही.
२०१९ची औरंगाबाद लोकसभा निवडणूक जाधव यांनी लढवली. त्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जाधव यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावतील, अशी शक्यता होती. मात्र,प्रत्यक्षात त्यांनी स्वतंत्र पक्ष, संघटना स्थापनेचा प्रयत्न केला. आता ते शिंदेसेनेच्या जवळ आहेत. यासंदर्भात विचारणा केली तेव्हा जाधव म्हणाले, की कन्नडला मंजूर झालेली एमआयडीसी प्रत्यक्षात आणताना भूसंपादनात काही जणांनी खोडा घातला. आमदार उदयसिंह राजपूत यांनाही त्यात काही करता आले नाही. म्हणून मी एमआयडीसी पुनरुज्जीवनाचा प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात जाधव कन्नड नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेशी आघाडी करतील. त्यात यश मिळाले तरच पुढचे पाऊल उचलतील, असे समजते.