चंद्रपूरातील ब्रम्हपुरी येथील नवीन न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात? याबाबत तर्क लावले जात आहे.
पौर्णिमा मिलिंद लाडे (27), असे मृत तरुणीचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी ब्रम्हपुरी येथे आली होती. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ती तालुका न्यायालय इमारतीच्या लोखंडी प्रवेश द्वारावर गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तिने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणाची दखल ब्रम्हपुरी पोलिसांनी घेतली आहे. ही आत्महत्या की घातपात याचाही शोध घेतला जात आहे.
तणावामुळे आत्महत्या केल्याच्या घटना नेहमी घडतात. 3 डिसेंबरला नागपुरात रायसोनी काॅलेजच्या योगेश विजयकुमार चौधरी या विद्यार्थ्याने काॅलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. “माझे शिक्षणाचे वर्ष वाया गेले. मला जगावेसे वाटत नाही. मी आत्महत्या करील’ असे सांगून योगेशने आत्महत्या केली होती. तत्पूर्वी त्याने लाॅ अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्याचे प्रयत्न केले होते. तिथे प्रवेश न मिळाल्याने त्याचे वर्ष वाया गेल्याचे दु:ख त्याला होते.
यापूर्वी 18 ऑगस्ट 2022 रोजी दिव्या नेवराम गिऱ्हारे या 19 वर्षीय मुलीने पेपर चांगले नाही गेले म्हणून आत्महत्या केली होती. ती नरखेड तालुक्यातील शेंबडा येथील रहिवासी होती. मृत दिव्या ही बीएसस्सीच्या प्रथम वर्षाला होती. तिचे पेपर चांगले न गेल्यामुळे ती तणावात होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी कुणीही नसताना तिने धान्यामध्ये टाकायचे विषारी पावडर खाल्ले.
यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला आधी सावनेर येथील शासकीय रुग्णालय दाखल केले. मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने पुढे नागपूर मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.