पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे रविवारी लोकार्पण झाले. या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघाताची घटना घडली आहे. नागपूर -शिर्डी हे अंतर कमी झाले असले, तरी सुसाट वाहनांमुळे महामार्ग पोलिसांची चिंता वाढलीय.
समृद्धी महामार्गावर पहिला अपघात सोमवारी झाला. वायफळ टोल नाक्यावर वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने पुढच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी दोघांमध्ये समेट झाल्याने तक्रार दाखल केली नसल्याची माहिती हिंगणा पोलिसांनी दिली. आज, मंगळवारी पुन्हा एक घटना समृद्धी महामार्गावर घडली. ब्रिजखाली ट्रक अडकल्याने गोंधळ निर्माण झाला. समृद्धी महामार्गाच्या ब्रिजची उंची कमी आहे. त्यामुळे नगर मनमाड महामार्गावरील शिर्डी इंटरचेंजजवळ चेन्नईहून ऑईल रिफायनरीचे मशीन घेऊन धुळ्याच्या दिशेने जात असलेला ट्रक ब्रिजखाली अडकला. यामुळे ट्रक चालकासह पोलिसांची तारांबळ उडाली.