अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्ह्णून सिद्ध होतो. पण अनेक असे पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा उलट प्रभाव होऊ शकतो. अनेकदा आठवडाभर कामात व्यस्थ असणारी मंडळी शनिवार- रविवारी आठवड्याची भाजी, फळे आणून ठेवतात. फ्रीजमध्ये अनेकदा आपण अगदी पद्धतशीर या भाज्या लावून ठेवतो. या भाज्या धुवून, स्वच्छ करून अनेकजण चांगलं प्लास्टिकमध्ये कव्हर करून सुद्धा ठेवतात पण तरीही काहीच दिवसात ही फळे, भाज्या सडतात. अनेकदा वरून जरी तुम्हाला अंदाज आला नाही तरी अशा भाज्यांचे सेवन करणे धोक्याचे ठरू शकते. आज आपण नेमक्या कोणत्या भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे हे जाणून घेणार आहोत.
टोमॅटो
आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्या चव व गंधात बदल होऊ लागतो. अनेकदा टोमॅटो नरमही होतात. टोमॅटो हा अशी फळभाजी आहे जो एथिलीन गॅस बाहेर सोडतो जो इतर भाज्यांना सुद्धा वेगाने पिकवतो. जर आपण आठवड्याभरासाठी टोमॅटो आणणार असाल तर ते किचनमध्ये रूमच्या तापमानात ठेवा.
काकडी
शेती व निसर्ग विज्ञान कॉलेजमधील अभ्यासकांच्या माहितीनुसार, जर काकडीला १० डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात काही दिवस ठेवले तर काकड्या लवकर खराब होऊ शकतात. अशा काकड्या नरम होतात व त्या खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच काकडी नेहमी रूमच्या साध्या तापमानात ठेवावी.
बटाटा
अनेकजण बटाटा सुद्धा इतर भाज्यांसह फ्रीजमध्ये ठेवतात. बटाट्यामधील स्टार्च कमी तापमानात साखरेत बदलतो. यामुळे ज्यांना अगोदरच ब्लड शुगरचा किंवा डायबिटीजचा त्रास असेल तर हा त्रास आणखी वाढू शकतो.
लसूण
हेल्थलाईनच्या माहितीनुसार लसूण साठवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण रूमच्या तापमानात एका टोपलीत किंवा ट्रे मध्ये मोकळ्या करून ठेवाव्यात. शक्य झाल्यास लसूणाचा कांद्याची गाठ बांधून एका कोपऱ्यात ठेवू शकता. पण लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने कोंदट वातावरणात लसणाचा दर्प पसरू शकतो. यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले अन्य पदार्थही खराब होऊ शकतात.