हिवाळी अधिवेशन असल्याने नागपूरमधल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत अशीही माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये करोनाचे रूग्ण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
पत्रकात काय म्हटलं आहे?
सद्य स्थितीत करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये कोव्हिड १९ ची लाट पसरली आहे. या विषाणूचा शिरकाव भारतात होऊन पुन्हा एकदा करोनाच्या चौथ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी मास्कचा उपयोग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यलाय, अस्थापन येथील अधिकारी आणि कर्मचारी तसंच भेट देणारे नागरिक यांनी मास्कचा वापर करावा.