नागपुरात नायलॉन मांजामुळे घरासमोर रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकलीचा अलीकडेच गळा कापला होता.ही घटना ताजी असतानाच परत एकदा मांजामुळे एका युवकाचा गळा कापल्याची घटना समोर आली आहे.
शहरातील राणी दुर्गावती चौक परिसरात सायकलने परत येत असताना हा प्रकार घडला. शाहनवाज हुसैन मलिक (वय 18) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याला 16 टाके पडले आहेत.
पोलिस कारवाई कधी?
बंदी नायलॉन मांजामुळे एका 5 वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना शुक्रवार 6 जानेवारी रोजी नागपुरातील फारूकनगर भागात घडली होती. या घटनेतील मुलगी वाचली असून, तिला तब्बल 26 टाके पडले. या घटनेमुळे प्राणघातक नायलॉन मांजाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुलगी घरासमोरच रस्त्यावर खेळत असताना तिचा नॉयलॉन मांजाने गळा कापल्या गेला आहे. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. बंदी असूनही शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात आहे. पकडले जाऊ नये म्हणून मांजा विक्रेत्यांनी घरपोच सेवाही सुरू केली आहे. तर ऑनलाईन खरेदीही सुरू आहे. पोलिस थातुरमातुर कारवाई करीत 100 ते 200 चक्री जप्त करतात. पण, विक्रेत्यांचे जाळे अधिक मजबूत आहे.
बेकायदेशीर विक्री
संक्रात जवळ आली असून मांजा आणि पतंग विक्रीचा बाजार सजला आहे. सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. दुकानासमोर दुसरा मांजा विक्रीला ठेवला जातो. ग्राहकाने इशारा केल्यास हवा तेवढा नायलॉन मांजा मागच्या दाराने उपलब्ध करून दिला जात आहे. या मांजाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे. यापूर्वी 5 जानेवारी 2022 रोजी आशीनगर झोनमधील किदवई शाळेतील शिक्षक सगीर अहमद घरी परत येत असताना मांजामुळे गळा कापला जाऊन हाताच्या बोटाला जखम झाली होती. परिसरातील नागरिक वेळीच मदतीला धावल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता.