शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाही. हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. दहा वर्षांत अडीच लाख कोटींवर हा खर्च जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले.
नागपूर शिक्षक मतदारसंघातील भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ रेशीमबाग येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते.
खासदार कृपाल तुमाने, निवडणूक प्रमुख आमदार मोहन मते, नागो गाणार यांच्यासह स्थानिक आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. गेले काही दिवस नागो गाणार यांनी एकच मिशन जुनी पेन्शन यावरून लक्ष वेधले होते. आजही त्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला. या संदर्भात फडणवीस बोलत होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने भाजपला या मुद्द्यावर उगीच बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हा निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाही असेच आपण वारंवार स्पष्ट केल्याचेही फडणवीस म्हणाले. शिक्षकांच्या प्रश्नावर लढणारा एक नेता आपल्या सोबत आहे. आमदार असो वा नसो त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिलेत.