पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत टिप्पागड जंगलात रस्त्याच्या कडेलगत नक्षल्यांनी स्फोटके पुरून ठेवली होती. विशेष अभियान पथकाच्या पोलिसांनी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली यातील रायफल आणि अन्य साहित्य हुडकून काढली आहेत.
तसेच गोंदिया पोलिसांनी 6-7 नक्षलवादाना महाराष्ट्र सीमेत येण्यापासून रोखले. 20 मिनिटे चकमक झाली. पोलिसाचा दबाव बघता सालेकसा तालुक्यातील टेकेझरी जंगलातून नक्षलवादानी पळ काढला. यात कोणीही जखमी झालेला नाही, अशी माहिती आहे.
तर टिप्पागड जंगलात नक्षलविरोधी अभियान पथक आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान शुक्रवारी (ता.7) नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. यावेळी त्यांना जमिनीत लपवून ठेवलेली एक बारा बोर रायफल, दोन देशी बनावटीची स्फोटके आणि अन्य साहित्य आढळून आले.
पोलिसांनी हे साहित्य शिताफीने बाहेर काढले. यामुळे मोठा घातपात टळला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस विभागाने आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.