मोबाईलमधून अनेक मुलं ऑनलाईन जुगार खेळताना निदर्शनास येत असतात. त्यातून ऑनलाईन जुगाराला बळी पडून ते सर्वस्व गमावून बसतात. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळे तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत.
ऑनलाईन गेमच्या नादात एका तरुणाचे तब्बल 40 लाख रुपये गेल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या ढगी गावात घडला आहे. परमेश्वर केंद्रे, असे या तरुणाचे नाव असून धक्कादायक म्हणजे त्याला गेमच्या आहारी शेत जमीनही विकावी लागली. परमेश्वरला मागच्या एक वर्षांपासून मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची सवय लागली. सुरुवातीला त्याने शंभर, हजार रुपयांनी हा गेम खेळला. यामध्ये त्याला पैसेही येऊ लागले. त्यानंतर तो हजारो रुपये यामध्ये गुंतवून तो गेम खेळू लागला. बघता-बघता यामध्ये शेत जमीनही विकावी लागली असून यामध्ये त्याचे वर्षभरात तब्बल 40 लाख रुपये गेले आहेत.
मॉस्ट बेट हा गेम परदेशातल्या एका कंपनीनं तयार केला आहे. त्याला भारतात खेळण्यास परवानगी नाही. प्ले स्टोअरवर हा गेम उपलब्ध नसून तो तुम्हाला लिंकद्वारे डाऊनलोड करावा लागतो. यामध्ये गेमिंगचे अनेक प्रकार आहेत. सुरुवातीला हा आपल्याला बोनसचं अमिष दाखवून गेम खेळण्यास भाग पाडतो आणि हळू हळू आपण या गेमच्या आहारी जाऊन सर्वस्व गमावून बसण्याची वेळ येते.