गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचातील गोदावरी नदीपात्रात दोन युवक आंघोळ करताना बुडल्याची घटना रविवार १३ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली.
हिमांशू अरूण मोन (२०) रा. नागपूर, सुमन राजू मानशेट्टी (१७) रा. आसरअल्ली ता. सिरोंचा अशी मृतकांची नावे आहेत.
तेलंगणा राज्यातील कालेश्वर येथील देवस्थानात दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळी हिमांशू अरूण मोन (२०) रा. नागपूर, सुमन राजू मानशेट्टी (१७) रा. आसरअल्ली ता. सिरोंचा, नगरम येथील कार्तिक पडार्ला (१९) नवीन पडार्ला (२१) व रंजीत पडाल (२०) निघाले होते. दर्शन घेण्यापूर्वी आंघोळीसाठी युवक सिरोंचा तालुक्याच्या हद्दीतील गोदावरी नदी पात्रात उतरले. यापैकी एक-दोन युवकांना पोहता येत नव्हते. आंघोळ करताना मित्रांसोबत ते खोल पाण्यात गेल्याने यापैकी हिमांशू मून व सुमन मानशेट्टी हे अतिखोलात गेल्याने ते बुडाले. तेव्हा इतर मित्रांनी व परिसरातील लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात यश मिळाले नाही. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता सिरोंचा पोलिस व एसडीआरएफच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन मासेमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. सायंकाळी ५:३० वाजता युवकांचे मृतदेह सापडले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.