छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पांढरी वाघिण अर्पिता हिने गुरुवारी सकाळी 7.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला आहे. अर्पिता वाघिण आणि बछड्यांची तपासणी प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकांनी केली.
ही गुड न्यूजचा आनंदोत्सव महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी साजरा केला. उपस्थित कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करून सर्वांचे तोंड गोड केले.
तिन्ही बछडे अन् वाघिणीची तब्येत चांगली
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिण व तिन्ही बछड्यांची तब्येत चांगली असल्याचे सांगितले आहे. बछडे आईचे दूध पिताना दिसून आलेले आहेत. वाघिण स्वतः बछड्याची निगा व काळजी घेत आहे. तसेच केअर टेकर मार्फत सुद्धा बच्छड्यांची देखभाल केली जात आहे. त्यांच्या देखभालीसाठी डे-नाईट कर्मचारी नियुक्त करण्यात आले.
आता एकूण 6 पांढरे वाघ सिद्धार्थ उद्यानात
वीर आणि अर्पिता या वाघांच्या जोडीमुळे या बछड्याचा जन्म झाला आहे. आज जन्मलेल्या तीन बछड्यामुळे आता एकूण सहा पांढरे वाघ सिद्धार्थ उद्यानात आहेत, अशी माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.