संभाजीनगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार हे आपल्या मतदारसंघातील कामे मी सांगेल त्याच कंत्राटदाराला मिळाली पाहिजेत, असा आग्रह धरतात. कुणी ऐकले नाही तर त्याला हातपाय तोडण्याची धमकी देतात, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, एवढेच नाही तर पैठणचे संदीपान भुमरे, गंगापूरचे प्रशांत बंब आणि वैजापूरचे रमेश बोरनारे हे कंत्राटदारांकडून कामाचे 15 टक्के आपल्यालाच मिळावे, असाही दबाव ते अधिकाऱ्यांवर टाकतात, असा आरोप त्यांनी केला आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपानंतर आता या तिघांकडून काय उत्तर मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावे
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, पालकमंत्री भूमरे स्वतः अशा धमक्या देत आहेत. असाच प्रकार वैजापूर मध्येही सुरू असून या तालुक्यातील सिंचनाच्या कामासाठी 350 कोटी निधी मंजूर झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. दरम्यान, येत्या 16 सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठक होत आहे. यात नेहमी प्रमाणे केवळ घोषणाच होऊ नये. प्रत्यक्षात कामे करण्याकडे देखील लक्ष द्यावे. आदर्श को ऑप. सोसायटीच्या घोटाळ्याविरोधात मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा नेण्यात येणार आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावे, अशी मागणी केली जाणार असल्याचे जलील यांनी सांगितले.
आम्ही संरक्षण देऊ
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, मंत्रिमंडळाने 2016 मध्ये जाहीर केलेल्या घोषणांचे काय झाले. हे सरकार पुन्हा त्याच घोषणा करून मराठवाड्यातील जनतेला वेडे बनवत आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे, आ. प्रशांत बंब व आ. रमेश बोरणारे त्यांच्या मतदारसंघात सिंचनाचे कोणतेच काम इतर कंत्राटदारास काम करू देत नाही. निविदा भरणाऱ्या कंत्राटदारास हातपाय तोडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अन्यथा थेट 15% कमिशन मागितले जाते. या कंत्राटदारांनी आमच्याकडे यावे, आम्ही त्यांना संरक्षण देऊ, असेही यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे.