श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.
दत्त जन्म कथा…
दत्तपंथीयांना प्रमाणभूत वाटणारा मराठी ग्रंथ म्हणजे ‘श्रीगुरुचरित्र’ होय. आज दत्तपंथावर सर्वांत मोठा प्रभाव श्रीगुरुचरित्राचा असल्याने त्यातील चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे दत्त जन्म कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत.
ब्रह्मदेवाने आपल्या मनस्तत्त्वापासून जे सात पुत्र निर्माण केले त्यांत अत्री एक प्रमुख होत. या ‘अत्रिऋषीची भार्या अर्थात माता अनुसूया पतीव्रता होती. पतीपरायन अनुसूयाच्या तेजामुळे तिन्ही लोक प्रभावित झाले होते. इंद्रालाही आपले आसन डळमळीत झाल्यासारखे वाटत होते. अशा या अनसूयेचा मत्सर इंद्रादी देवांना वाटू लागला. कारण ही आपल्या पातिव्रत्याच्या प्रभावाने स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल; आपले स्वर्गातले स्थान जाईल; अशी त्यांना भीती वाटली. यानंतर अनसूयेचे सत्त्व हरण करण्यासाठी इंद्रादी देवांच्या विनंतीवरून ब्रह्मा, विष्णू व महेश हे तीन देव भिक्षुकांची रूपे घेऊन अत्रींच्या आश्रमापाशी आले. या वेळी अत्रिऋषी जपतपादी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. ‘आपण भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी त्वरित भोजन घालावे’ अशी विनंती या भिक्षुकांनी केली. सती अनसूयेने या तीनही भिक्षुकांचे मनापासून स्वागत केले. मात्र, देवांनी योजल्या प्रमाणे त्यांना विवस्त्र होऊन अन्न वाढण्यास सांगितले. थोडा विचार करून अनुसया मातेने पती चिंतन केले आणि आलेल्या अतिथींवर तीर्थ सिंचन केले. त्याबरोबर त्या अथिथींचे तीन बालके झाले. तीनही बालके पिऊन तृप्त झाल्यानंतर अनसूया मातेने त्यांना पाळण्यात घालून अंगाई गीते गायला सुरुवात केली. एवढ्यात अत्री ऋषी आश्रमात आले. त्यांना नमस्कार करून सर्व वृत्तान्त अनसूयेने सांगितला.
अनसूयेच्या पतिव्रत्याचा प्रभाव पाहून अत्रीही संतुष्ट झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितल्यावर ती म्हणाली, ‘तिघे बाळक आमच्या घरीं । रहावे आमच्या पुत्रापरी । हेंचि मागणें निर्धारीं। त्रिमूर्ति असावें एकरूप ।।. याप्रमाणे ही तीनही बालके आश्रमात राहिली.
ब्रम्हा व शिव तपश्चर्या साठी निघून गेले. त्यावेळी ब्रम्हा हे चंद्र अवतार, शिव हे दुर्वास ऋषी झाले. विष्णू मात्र आई जवळ थांबून दत्त अवतार झाले आणि तिन्ही देवाचे प्रतीक म्हणून ब्रह्म कमंडलू शिवाचे त्रिशुळ, आणि विष्णू चे चक्र आपल्या हाती धारण केले. याचसोबतच दत्तात्रेयांच्या जन्माच्या आणखी वेगवेगळ्या कथा प्रसिद्ध आहेत.