नागपुरात मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून हलक्या फुलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. भारतात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. शनिवारी विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि आता पुन्हा येत्या ४८ तासांत देशातील हवामान बदलण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत.
पाऊस आणि वादळासाठी कारणीभूत ठरणारे चक्रीवादळ पाठ सोडायला तयार नाही. आता बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र पसरले आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंघावण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यात सातत्याने कडाक्याची थंडी आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवू लागला होता. मात्र, थंडीचा पुरेपूर आनंद घेण्याआधीच महाराष्ट्राला अवकाळी पावसाच्या संकटाची चाहूल लागली आहे. पुढील तीन दिवस हा अवकाळी पाऊस कायम राहील असा अंदाज आहे.
बांगलादेशसह दक्षिण भारतात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे. त्यामुळे देशातील काही भागांत पावसाळी वातावरण राहील. विदर्भातही याचे पडसाद उमटणार आहेत. दरम्यान, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पूर्व विदर्भात २२ जानेवारीनंतर २३, २४ जानेवारीला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातसुद्धा पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान उत्तरप्रदेशात मात्र थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. तर काही राज्यांमध्ये धुक्याची चादर दिसून येणार आहे.