प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. फुटाळा चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते व त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. ही बाब लक्षात घेता २६ जानेवारीला फुटाळ्यात सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
फुटाळा तलाव चौपाटी मार्गावर दरवर्षी सकाळपासूनच तरुणाईची गर्दी होते. अनेक जण तर नियमांचे उल्लंघन करत वाहने चालवतात आणि पोलिसांनी कारवाई केली तर आक्रमक पवित्रा घेतात. सामान्य जनतेला यामुळे नाहक त्रास होतो. हीच बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीस आयुक्त शशिकांत सातव यांनी निर्देश जारी केले आहेत. फुटाळा तलावाकडून अंबाझरीकडे जाणारे वळण ते फुटाळा तलाव टी-पॉईंटपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. वाडी नाक्याकडून फुटाळा तलावामार्गे जाणारी वाहतूक जुना वाडी नाका ते रविनगर या मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच भरतनगरकडून जाणारी वाहतूक अमरावती रोड/रवीनगर महादेव मंदिर वायुसेनानगर या मार्गे वळविण्यात येणार आहे. वायुसेना मार्ग ते फुटाळा तलाव ही वाहतूक महादेव मंदिर तेलंगखेडी मार्गे वळविण्यात येईल. २६ जानेवारी रोजी सकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनांना ‘नो एन्ट्री’ असेल.
जागोजागी कडेकोट बंदोबस्त
नागपूर पोलिसांतर्फे शहरात सर्वच महत्त्वाचे चौक व मार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्सदेखील लावण्यात येतील. संशयास्पद हालचालींवर पोलिसांचा वॉच असणार आहे.