उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्याच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दिवसाही गार, बोचरे वारे वाहत असल्यामुळे राज्यभरात थंडी जाणवत असून, आबालवृद्धांना हुडहुडी भरली आहे. दिवसभरात सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा जोर वाढला आहे, तसेच बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर कमी झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वेगाने घट झाली आहे. किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. कमाल तापमानातही सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. दुपारी तासभर उन्ह पडल्यानंतर लगेच पुन्हा थंड, बोचरे वाहत आहे. त्यामुळे दिवसभरही हवेत गारठा जाणवत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही थंडीचा सामना करावा लागत आहे.
राज्यात गुरुवारी किमान तापमानात सरासरी एक ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली. विदर्भात अकोल्यात ९.५, गोंदियात ९.५, नागपुरात ८.७, यवतमाळमध्ये ९, उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये ९.३, मालेगावात ९.४. नाशिकमध्ये ८.६, मराठवाड्यात औरंगाबादमध्ये ९.४. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ८.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे पुढील तीन दिवस कमाल-किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
थंड वाऱ्याचा वेग ताशी २५० किलोमीटर
उत्तरेकडून येणारे थंड वारे समुद्रसपाटीपासून सुमारे १२ किलोमीटर उंचीवरून ताशी सुमारे २५० किलोमीटर वेगाने वाहत आहेत. त्या वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून आणि भंडाऱ्यातून थंड हवा राज्यात दाखल होत आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. महिनाअखेरपर्यंत थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.