बॉलीवूड अभिनेत्री व प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिचं कर्करोगामुळे निधन झाल्याचं वृत्त शुक्रवारी समोर आलं होतं. याबाबत अभिनेत्रीच्या टीमकडून तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करण्यात आली होती. अखेर आता खुद्द पूनमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सरव्हायकल कॅन्सरसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा स्टंट केल्याची कबुली दिली आहे.
पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त तिच्या पीआर टीमकडून सर्वत्र पसरवण्यात आलं. परंतु, अभिनेत्रीच्या कुटुंबीयांकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यामुळे पूनमच्या मृत्यूबद्दल गूढ निर्माण झालं होतं. अखेर २४ तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर पूनमने स्वत: पडदा टाकला आणि इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही” असं स्पष्ट केलं. परंतु, तोपर्यंत ही बातमी सर्वत्र पसरली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एका कार्यक्रमात पूनमच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. याशिवाय सभेला उपस्थित सामान्य नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. शनिवारी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात महिला शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अजित पवारांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी महिलांच्या आजारांबाबत जनजागृती करताना त्यांनी पूनम पांडेच्या निधनाचा उल्लेख केला. परंतु, ही सभा पार पडत असताना पूनमने स्वत:च्याच निधनाचा एवढा मोठा स्टंट केल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. या पब्लिसिटी स्टंटपासून उपमुख्यमंत्री अनभिज्ञ होते.
अजित पवार म्हणाले, “धकाधकीच्या जीवनात काम करत असताना कधी कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. आज सकाळी मी वर्तमानपत्रात वाचलं. एक कमी वयाची पांडे म्हणून अभिनेत्री होती तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयात ती आपल्याला सोडून गेली. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की, तुम्ही सगळे काळजी घ्या. आम्ही देखील सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ आणि महानगरपालिका सुद्धा तुमची काळजी घेईल.”
दरम्यान, निधनाचा एवढा मोठा स्टंट केल्यावर पूनम पांडेने शनिवारी सकाळी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. पूनम जिवंत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला. तिच्या विरोधात सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. काही युजर्सनी कमेंट्स करत पूनमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.