काँग्रेसमध्ये अर्ध्याहून अधिक आयुष्य घालवलेले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारी, 12 फेब्रुवारीला पक्षाचा राजीनामा दिला. आणि एकच खळबळ माजली. काँग्रेससोबतच 50 वर्षांच असलेलं नातं संपवल्यानंतर मंगळवारी अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात गेले. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये बरीच खळबळ माजली. पक्षनेतृत्व संघटना मजबूत करण्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत आपण काँग्रेसवर खुश नसल्याचं चव्हाण पक्ष सोडल्यावर म्हणाले. मात्र, आपल्या ज्योतिषाच्या सांगण्यावरून 66 वर्षीय चव्हाण यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेऊन अशोक चव्हाण यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय समस्यांवर चर्चा केली होती. महंतांनी त्यांच्यासाठी शास्त्रानुसार तीन महिने नियम तयार केले. चव्हाण यांनी त्या नियमांचे संपूर्ण निष्ठेने पालन केले. शेवटी महंतांनी चव्हाण यांना त्यांचा राजकीय संबंध बदलण्याचा, “परिवर्तन” करण्याचा सल्ला दिला. अशोक चव्हाण यांनीही त्या सल्ल्याचे पालन केले. महंत अनिकेत शास्त्री यांनी स्वतः ही गोष्ट मान्य केली आणि ‘मी त्यांना पक्ष बदलण्याचा सल्ला दिला होता’ असे सांगितले. कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यास किंवा स्वत:ची संघटना सुरू करण्यास ते मोकळे होते, असे त्यांनी नमूद केले.