2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी देशभर मोर्चेबांधणी करत आहे. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. तसेच अनेक लहान-मोठे पक्ष एनडीएत सहभागी झाले आहेत. त्यामुळे देशात एनडीएची ताकद वाढू लागली आहे. बिहारमधील भाजपाचे जुने सहकारी नितीश कुमारही एनडीएत परतले आहेत. दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. संयुक्त शिवसेना आणि भाजपाची तीन दशकांहून अधिक काळ युती होती. आता शिवसेनेचा शिंदे गट एनडीएचा सदस्य आहेत. अशातच उद्धव ठाकरे एनडीएत परतणार असतील तर भाजपा त्यांचं स्वागत करेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे आणि भाजपाची जुनी मैत्री आहे. हे दोन मित्र पुन्हा एकत्र येतील का? यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या चर्चेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे आमच्याबरोबर येण्याची कुठलीही शक्यता नाही. याचं कारण असं आहे की, उद्धव ठाकरे यांनी आमच्यासाठी दारं बंद केली आहेत. केवळ दारं बंद केली नाहीत तर आमची मनं दुरावली आहेत. राजकारणात प्रत्येक व्यक्तीचं आणि पक्षाचं राजकीय धोरण असतं. तुमचं आणि माझं धोरण वेगळं असू शकतं. अनेकवेळा एखाद्या गोष्टीवर राजकीय मतभेद होतात. ते मतभेद दूर करून एकत्र येणं शक्य असतं. परंतु, इथे (भाजपा-उद्धव ठाकरे) मात्र परिस्थिती तशी नाही.” लोकमतला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर सविस्तर मतं मांडली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपा-उबाठा सेनेबद्दल बोलायचं झाल्यास इथे आताची परिस्थिती अशी आहे की आमची मनं दुखावली आहेत. उद्धव ठाकरे यांचा आमच्याबरोबर ज्याप्रकारचे व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन ते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, या सगळ्या गोष्टींनी आमची मनं दुखावली गेली आहेत. जिथे मनं दुखावतात तिथे युती होत नाही. राजकीय मतभेद असतील तर ते दूर करून युती होते. परंतु, जिथे मनं दुरावलेली असतात, तिथे एकत्र येणं कठीण असतं आमची मनं दुरावली आहेत. यात शंका नाही.
मनसे महायुतीत येणार का?
दरम्यान, फडणवीस यांनी यावेळी भाजपा आणि मनसेच्या युतीच्या चर्चांवरही भाष्य केलं. ते म्हणाले, आगामी काळात मनसे कुठे असेल, कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल. आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्याशी मैत्री आहे. आमच्या अधून-मधून भेटीगाठी होतात. आमच्या अनेक विषयांवर गप्पा होतात. राज ठाकरे बऱ्याचदा काही चांगल्या सूचना करतात. कधीकधी आमच्यावर टीकाही करतात. परंतु, आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही हे आत्ता सांगू शकत नाही. ही गोष्ट लवकरच आपल्याला संमजेल. अद्याप कोणीही त्यावर निर्णय घेतलेला नाही.