महिलांना संरक्षण मिळावं यासाठी वेगवेगळे कायदे केले जातात. पण तरीही काही ठिकाणी महिलांना सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. या महिलांना देहविक्रीच्या दलदलीत ढकललं जातं. महिलांना शिक्षणाचा आणि सन्मानाने नोकरी करण्याचा अधिकारी आहे. हा अधिकार त्यांच्यापासून हिरावला जातोय. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना देहविक्रीच्या अतिशय घाणेरड्या गर्तेत ढकलणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. अशाप्रकारचं वाईट कृत्य करणाऱ्यांना रोखलं पाहिजे आणि पीडितांची सुखरुप सुटका करायला हवी. जळगावच्या चोपड्यात पोलिसांनी अशा तब्बल 60 पीडित महिलांची सुटका केली आहे. त्यामुळे पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. चोपडा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
कुंटणखान्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कुंटणखान्यावर धाड टाकली. या धाडीत एकूण 60 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कुंटनखाना चालवणाऱ्या 11 महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
10 मालकीण आणि 5 दलालांना अटक
चोपडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटनखान्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकला. यात जिल्ह्यासह परराज्यातील 60 तरुणी आढळून आल्या आहेत. तर कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान, पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकली त्यावेळी एकही गिऱ्हाईक नव्हतं. पोलिसांनी 5 दलाल, 10 मालकीण महिलांसह 60 महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात, अशी माहिती तपासातून समोर आली.