जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या दिल्लीतील मॉडेल तरुणीला दलालांनी देहव्यापार करण्यासाठी विमानाने नागपुरात बोलावले. मनिषनगर येथील हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये शहरातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आंबटशौकीन ग्राहकांना तरुणीकडे पाठविण्यात येत होते. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून कारवाई केली. ही कारवाई शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान केली.
देहव्यापारातील मोठा दलाल बंटी ऊर्फ बिलाल अहमद अली याचे चित्रपट सृष्टीत आणि मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींशी संबंध आहेत. तसेच रशिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, पाकिस्तान आणि उज्बेकिस्तान येथील देहव्यापाराशी संबंधित एजन्सीसोबत संबंध आहेत. त्यामुळे तो नेहमी देहव्यापार करवून घेण्यासाठी देशविदेशातील तरुणींना नागपुरात आणत असतो. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्यांना तो टीव्ही मालिका, जाहिराती, मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींना पुरवतो. गेल्या काही दिवसांपासून त्याने दिल्लीत टीव्ही जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या मॉडेल तरुणीला विमानाने बोलावून घेतले. तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. तरुणीला विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये ठेवून गेल्या आठ दिवसांत १५ लाख रुपयांची कमाई केल्यानंतर तिला हॉटेल अशोकामध्ये पाठविण्यात आले होते.
बेलतरोडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांना माहिती मिळताच सापळा कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे आरोपी दलाल विशालला त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. आरोपी विशालने हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये ३० हजार रुपयात तरुणीला देहव्यवसायासाठी उपलब्ध करून दिले. पोलिसांनी तेथे धाड टाकून घटनास्थळावरून तरुणीला ताब्यात घेतले. तरुणीची पोलिसांनी चौकशी केली असता बंटी ऊर्फ बिलाल अहमद अलीने ५ लाख रुपये महिन्याच्या करारावर नागपुरात आणल्याचे सांगितले. बिलालने विशालसोबत संगनमत करून देहव्यवसाय करण्यासाठी ग्राहकांचा पुरवठा केल्याची कबुली दिली. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनी आरोपी विशाल आणि बिलाल बंटीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, उपनिरीक्षक अच्युत रिंडे, अनिल गडवे, तेजराम देवळे, रवींद्र आकरे, प्रशांत ठवकर, कुणाल लांडगे, अश्विनी टेंभरे आणि छबू इंगळे यांनी केली.