महानिर्मिती या शासकीय कंपनीच्या पत्राचा वापर करून बेरोजगार तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचे उघड झाले आहे. या बनावट पत्रावर कार्यकारी संचालक (मानव संसाधन) यांची खोटी स्वाक्षरीही आहे. हे बनावट नियुक्तीपत्र समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्याने महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.
महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) यांना दोन बेरोजगार तरुणांनी फोन करून सांगितले की, त्यांना महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात सहाय्यक मुख्य अभियंतापदासाठी नियुक्तीपत्र मिळाले असून रुजू व्हायचे आहे. त्यावर संचालकांनी भरती प्रक्रियाच झाली नसल्याचे सांगत ते नियुक्तीपत्र व्हॉट्सॲपवर पाठवण्याची विनंती केली. ते पाहिल्यावर नियुक्तीपत्र संचालकांनाही धक्का बसला.
तातडीने महानिर्मितीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली गेली. अभ्यासांती हे नियुक्तीपत्र महानिर्मितीच्या बनावट पत्राचा वापर करून तयार करण्यात आल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, त्यावर ज्यांची स्वाक्षरी आहे ते २०१९ मध्येच या पदावरून इतरत्र गेले आहेत. या प्रकारानंतर महानिर्मितीने अशा बनावट नियुक्तीपत्रापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ज्यांना हे बनावट नियुक्तीपत्र मिळाले ते उमेदवार सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यता आहे.
“समाज माध्यमांवर दोन बनावट नियुक्ती पत्रे प्रसारित झाली. महानिर्मितीने या पदांसाठी कुठलीही प्रक्रिया राबवली नाही. हा गैरप्रकार बेरोजगारांची दिशाभूल करणारा व महानिर्मितीची प्रतिमा मालिन करणारा आहे. या संदर्भात लवकरच पोलिसात तक्रार करून दोषींवर कारवाई केली जाईल.” – डॉ. धनंजय सावळकर, कार्यकारी संचालक (मानव संसाधन), महानिर्मिती, मुंबई.
महानिर्मितीची पद भरती प्रक्रिया कशी?
महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरीवर लागण्याकरिता ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येते. ज्यामध्ये वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते सोबतच महानिर्मितीच्या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेसंदर्भात संबंधित उमेदवारांना वेळोवेळी कळविण्यात येते. मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर निवडीबाबतची अंतिम यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर देण्यात येते. एकूणच, महानिर्मितीमध्ये नोकरी करीता पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येते, याची बेरोजगार तरुण-तरुणी तसेच सामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महानिर्मितीकडून करण्यात आले आहे.