अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांना कानाला दुखापत झाली. त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली. परंतु, ते या हल्ल्यातून बचावले. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका सभेत ते बोलत होते, तेव्हाच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. २० वर्षीय शूटर थॉमस मॅथ्यू क्रुक्सने हा हल्ला केला असून या हल्ल्यात सभेत उपस्थित असणार्या माजी अग्निशमन प्रमुखाने आपले प्राण गमावले, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. ‘न्यूयॉर्क टाईम्स’चे ज्येष्ठ छायाचित्रकार डग मिल्स यांनी ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा नेमका क्षण कॅमेर्यात कैद केला.
हल्ला झाला अगदी त्याच क्षणी ट्रम्प यांनी आपले डोके फिरवले त्यामुळेच त्यांचा जीव वाचला. बरेच लोक असा दावा करत आहेत की, देवाच्या कृपेनेच त्यांचा जीव वाचला. कोलकाता इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) चे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि भगवान जगन्नाथ यांच्यातील संबंधांकडे लक्ष वेधल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यांनी नेमका काय दावा केला? डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण वाचण्याचा आणि भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचा नेमका संबंध काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा शूटर थॉमस मॅथ्यू क्रुक्स कोण होता? त्याने हा हल्ला कसा केला? या हल्ल्यामागचे कारण काय?
“भगवान जगन्नाथाच्या कृपेने ट्रम्प बचावले”
छायाचित्रकार मिल्सने हल्ल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि म्हटले की, ट्रम्प जर वळले नसते तर त्याच क्षणी त्यांचा मृत्यू झाला असता. याला ‘दैवी हस्तक्षेप’ असे संबोधले गेले. यावरच प्रतिक्रिया देत राधारमण दास म्हणाले, “होय, निश्चितच हा दैवी हस्तक्षेप आहे. जुलै १९७६ मध्ये, रथ बांधण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्कॉनच्या भाविकांना आपले ट्रेन यार्ड विनामूल्य देऊन त्यांची मदत केली होती. आज सर्वत्र रथयात्रा उत्सव साजरा होत आहे. याचदरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आणि भगवान जगन्नाथाच्या कृपेने या हल्ल्यातून ते बचावले.”
१९७६ मध्ये ट्रम्प यांच्या मदतीने न्यूयॉर्कमधील फिफ्थ अव्हेन्यू येथे भगवान जगन्नाथांची रथयात्रा काढणे शक्य झाले. यात एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, ट्रम्प यार्डमध्ये जो रथ तयार करण्यात आला, ते मॉडेल कोलकाता रथयात्रेसाठी वापरले गेले आणि भगवान जगन्नाथ आणि बलराम यांचे रथ तयार करण्यात आले. रथ बांधण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये फिफ्थ अव्हेन्यूजवळ एक मोठी, रिकामी जागा शोधणे ही एक समस्या होती. इस्कॉनच्या भक्तांनी संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये एक उत्तम रथयात्रा आयोजित करण्याचा विचार केला होता, परंतु जागेच्या अनुपलब्धतेमुळे हा विचार व्यर्थ ठरला.
१९७६ चा तो किस्सा
“इस्कॉनचे भक्त तोसन कृष्ण दास यांना मॅनहॅटनमधील पोलिस प्रमुखांकडून फिफ्थ अव्हेन्यू येथे परेड आयोजित करण्यास होकार देण्यात आला. हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते. पण, भव्य लाकडी रथ बांधण्यासाठी आम्हाला परेड मार्गाच्या सुरुवातीच्या ठिकाणाजवळ एक रिकामी जागा हवी होती. आम्ही अनेकांना विचारले, पण प्रत्येकाने नकार दिला. त्यांना विमा जोखीम इत्यादींबद्दल चिंता होती,” असे दास म्हणाले. संपर्क साधल्यानंतर, जवळजवळ प्रत्येक मोठ्या व्यावसायिकाने सांगितले की, ते पेनसिल्व्हेनिया रेल्वे यार्डमधील त्यांची मालमत्ता विकण्याच्या प्रक्रियेत आहेत, हे रथ बांधण्यासाठी अगदी योग्य स्थान होते. ट्रम्प यांनी जुने रेल्वे यार्ड विकत घेतल्याचे इस्कॉनच्या भाविकांना काही दिवसांनंतर समजले.
त्यानंतर भाविकांनी प्रेझेंटेशन बॉक्स आणि महाप्रसादाची टोपली त्यांच्या कार्यालयात नेली. त्यांनी ते घेतले. ट्रम्प यांच्या सेक्रेटरीने भाविकांना फोन करून माहिती दिली, “काय झाले ते मला माहीत नाही, पण त्यांनी तुमचे पत्र वाचले, तुम्ही दिलेला प्रसाद खाल्ला आणि लगेच होकार दिला.” सेक्रेटरी पुढे म्हणाली, “या आणि त्यांनी स्वाक्षरी केलेले पत्र घेऊन जा.” या ठिकाणी विशाल रथांची रचना इस्कॉनचे अभियंता आणि भक्त जयनंद प्रभू यांनी केली होती. मयेश्वर दासा म्हणून ओळखले जाणारे गॅरी विल्यम रॉबर्ट्स दोन वर्षांनी कोलकाता येथे गेले आणि त्यांनी १९७८ च्या कोलकाता रथयात्रेत वापरलेले रथांना अमेरिकेतील रथांप्रमाणे तयार केले.
जगन्नाथ रथयात्रा
ओडिशामध्ये होणारी जगन्नाथ रथयात्रा हा सर्वात जुना आणि सर्वात मोठा रथोत्सव मानला जातो. या प्रवासात भगवान जगन्नाथ स्वतः त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम यांच्यासह त्यांच्या विशाल रथावर शहराचा फेरफटका मारतात; जिथे ते त्यांच्या मावशी गुंडीचा मातेच्या घरी सात दिवस विश्रांती घेतात. हा जगन्नाथ रथयात्रेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. पहिला रथ भगवान बलरामांचा, मधला रथ बहीण सुभद्राचा आणि मागील रथ भगवान जगन्नाथाचा असतो. अशी आख्यायिका आहे की, ही परंपरा बाराव्या शतकात सुरू झाली. या रथयात्रा आषाढच्या महिन्यात जगभरातील शहरांमध्ये आयोजित केल्या जातात. भारतात या महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होते.