विकासाचा प्रश्न, रस्ते, पाणी आणि आरोग्यविषयक प्रश्न कायम असताना जिल्ह्याचे भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्याकडे फिरकुनही पाहिले नाही. त्यामुळे जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून थाऱ्यावर नसलेले पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित बेपत्ता झाल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अजय मेश्राम यांनी थेट पोलीस ठाण्यात केली. सध्या जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे.
नऊ महिन्यांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नंदुरबारचे आमदार आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची वर्णी लागली. त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री होते. मात्र पालकमंत्री झाल्यानंतर डॉ. गावित यांनी भंडारा जिल्ह्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप अजय मेश्राम यांनी केला आहे. निवडणुकीत मोठ्या नेत्यांसोबत कधीतरी हजेरी लावणारे गावित निवडणुकीनंतर पूर्णतः गायब झाले. त्यामुळे अनेक दिवसापासुन प्रशासकीय कामावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसुन शहरात प्रशासकीय कामे ‘राम भरोसे सुरु आहेत. अनेक ठिकाणी शासकीय यंत्रणेमध्ये अधिकारी मनमर्जी प्रमाणे वागत असल्याने जिल्ह्याच्या विकास कामांना मोठा फटका बसत असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
दुसरी कडे सामान्य माणसांचे साधे -साधे प्रश्न देखील अधिकारी वर्ग हे कुठल्याही प्रकारे गांभीयनि घेत नसल्याने सामान्य व्यक्तीनी अखेर कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न मेश्राम यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा पातळीवर अनेक तक्रारी असून या जिल्हा प्रशासन त्या सोडविण्यासाठी असर्थ ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी कुणाकडे तक्रार करायची असा सवाल मेश्राम यांनी उपस्थित केला आहे.
भंडारा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वैनगंगा नदी पात्रात वाढत चाललेल्या वनस्पतीमुळे नदीतील माशांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांचा मृत्यू आहे, पीक विम्याचा लाभ अनेकांना अद्याप मिळालेला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न असताना जिल्ह्याचे पालकत्व स्विकारलेले विजयकुमार गावीत यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचा आरोप मेश्राम यांनी केला आहे.
गावितांवर भंडाऱ्याचे पालकत्व लादले गेले आहे. त्यामुळे त्यांनी अद्याप इकडचा रस्ता धरला नाही, असे नागरिक बोलू लागले आहेत. सत्तापक्षाने आजवर भंडारा जिल्ह्यावर सातत्याने अन्याय केला आहे. आजवर जिल्ह्याला नेहमी बाहेरचा पालकमंत्री थोपवला गेला आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये गावितांचा रूपाने ही परंपरा कायम राहिली आहे. माजी मंत्री बंडू सावरबांधे यांच्याव्यतिरिक्त आजवर भंडारा जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळालेला नाही. पालकमंत्र्यांच्या बाबतीत भंडाराकरांचे नशीबच खराब आहे. पालकमंत्री गावित जिल्ह्याला वेळ देतील, त्यांच्याकडून विशेष लक्ष दिले जाईल, असा विश्वास लोकांचा विश्वास होता मात्र या विश्वासावर विजय गावित खरे उतरले नाहीत.
पालकमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला बऱ्याच दिवसांत कोणतेही निर्देश नसल्याने बरीचशी कामे प्रलंबित आहेत. पालकमंत्र्यांना आढावा घेतल्याशिवाय जिल्ह्यातील कामे मार्गी लागणार नाहीत. भंडारा जिल्ह्यातील नागरिक पालकमंत्री नाहीत म्हणून ओरड करत आहेत. बाहेरचा पालकमंत्री आम्हाला नको, अशी मागणी भंडाराकरांनी खूप आधीपासून केलेली आहे, गावितांसाठी भंडारा जिल्हा जर ‘जबरदस्तीचा राम राम’ असेल तर आताही मुख्यमंत्र्यांनी त्यांना बदलवून दुसरा पालकमंत्री द्यावा, अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.
पालकमंत्र्याच्या बाबतीत भंडारा जिल्हा कमनशिबी राहिला आहे. आज जिल्हा ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीत नव्या पालकमंत्र्यांना येथे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकर येऊन जिल्ह्याचा चार्ज घ्यावा आणि कामे मार्गी लावावी अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.
मी २६ जानेवारीला पालकमंत्री गावित यांची भेट घेतली, तेव्हापासून ते जिल्ह्यातून बेपत्ता झाले. पालकमंत्री साहेबांना शोधून कुणीतरी माझा संवाद त्यांच्याशी घालून देण्याची मागणी अजय मेश्राम यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अजय मेश्राम यांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तक्रार करते वेळी निलिमा रामटेके, अथर्व गोंडाणे, ईश्वर कळंबे, बबन बुद्धे, राजा खान ,प्रमोद चौहान शरीफ खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.