नागपुरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. इतवारी परिसरातील तींनल चौकातील खापरीपुरा येथील तीन मजली असलेल्या एका इमारतीच्या खालच्या माळावरील अत्तरचे गोदाम असलेला दुकानाला आग लागली यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाकडे कुटुंबातील तीन लोकांना वाचवण्यात यश आले मात्र त्यांची मुलगी या घटनेत दगावली. घटनास्थळी सात गाड्या पोहोचल्या होत्या दहा वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली होती मात्र धूर निघतच होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास झाला.
इतवारी परिसरात आठ दिवसापूर्वीच आहूजा पेन मार्ट या दुकानाला आग लागली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी चौकातील खापरीपुरा येथील असलेल्या तीन मजली इमारतीला पहाटेच साडेचार च्या सुमारास आग लागली. खाली प्रशांत शहा यांचे अत्तर विक्रीचे दुकान आणि गोदाम होते तर मधल्या माळ्यावर चपलाचे गोदाम होते. अत्तर गोदामात केमिकल पदार्थाचा वापर होत असल्याने आग भडकली. परिसरातील एका व्यक्तीला आग लागली असताना दिसल्यावर त्यांनी अग्निशमन विभाग आणि पोलिसांना आगीची माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या. पोलीस ही घटनास्थळी आले मात्र तोपर्यंत आज चांगलीच भडकली होती.
खाली आग लागली असताना बाकडे कुटुंबांना याची माहिती नव्हती. मात्र आग भडकत गेली. मोठ्या प्रमाणात धूर झाला. खालून लोकांनी आवाज दिले मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी तिसऱ्या माळ्यावर गेले. आणि त्यांनी प्रवीण बाकडे आणि त्याची पत्नी प्रीती बाकडे यांना बाहेर काढले. मुलगा वरती टेरेसवर गेला.आणि मुलगी अनुष्का बाथरूम मध्ये गेली. तिने दार बंद करून घेतले. मुलगी आत असल्याचे कळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला बाथरूम मधून बाहेर काढले मात्र ती बेशुध्द अवस्थेत होती. तिला खाली शिडीने खाली उतरविले. तात्काळ तिला रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचार सुरू असताना ती दगावली.आई-वडिलांना मात्र मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
इतवारी हा बाजाराचा परिसर असून दाटीवाटीचा आहे. अग्निशामक विभागाच्या गाड्या या परिसरात जात नाही. त्यामुळे विभागाला आग विझवण्यात प्रंचड अडचण येते. आजची आग ही अशाच ठिकाणी होती तिथे गाड्या जात नव्हत्या मात्र अग्निशमन विभागाने मोठे पाईप लावत आग विझवली. या घटनेत दगवलेली मुलगी अनुष्का बारावीत आहे तर मुलगा दहावीत आहे. प्रवीण यांचे परिसरात स्टेशनरी दुकान आहे.