नागपुरातील शंकरनगर ते धरमपेठकडे जाणाऱ्या एका ‘रस्त्या’वरील बहुमजली इमारतीत असलेल्या पबमध्ये मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तोकडे कपडे घालून मद्यधुंद आणि अमली पदार्थांच्या अंमलाखाली असलेल्या तरुण-तरुणींचा अक्षरशः धिंगाणा सुरु असतो.
याच पबमध्ये गांजा आणि ड्रग्जच्या नेहमी महापूर असतो. या पबवर एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून हुक्का पार्लर, पबमध्ये ड्रग्स, गांजा आणि अमली पदार्थांचे खरेदी-विक्री होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ड्रग्ज तस्कर महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या संपर्कात येण्यासाठी मोठमोठ्या पबच्या संचालकांच्या गाठीभेटी घेतात.
या पबमधून शहरातील अन्य पब, हुक्का पार्लर आणि मोठमोठ्या रेस्ट्रॉरेंटमध्ये ड्रग्सचा पुरवठा केल्या जातो. शहरातील शंकरनगर चौकातून रामनगरकडे जाताना ‘रस्त्या’वर बहुमजली इमारतीत पब आहे. शहरातील सर्वाधिक महागडा आणि पोलिसांच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित पब अशी ओळख निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मध्यरात्रीनंतर अनेक तरुण-तरुणी महागड्या गाड्यांमध्ये पबमध्ये येतात. आधीच मद्यधुंद असलेल्या तरुण-तरुणी रस्त्यावरच कारची मोठमोठ्याने हॉर्न वाजवतात आणि खालीच धिंगाणा घालतात.
तसेच पहाटेच्या सुमारास रस्त्यावर कार उभी करून कारमध्ये अश्लील कृत्य करतात. अन्य वाहनांची तोडफोड करणे, रस्त्यावर लघुशंका करणे, असे प्रकार करतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या पबमध्ये एकट्याने येणाऱ्या तरुणीला आणि तरुणाला पार्टनर मिळवून देण्याची सुविधा असल्याचे बोलले जाते. पबमध्ये मध्यरात्रीनंतर डिजेच्या मोठ्या आवाजात पहाटेपर्यंत गोंगाट सुरु असतो. या रस्त्यावरील शहरातील ‘नाईट लाईफ’चे चित्र बघायला मिळते.
या पबवर एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पबमालक बिनधास्तपणे सामान्य नागरिकांच्या तक्रारींची पर्वा न करता तरुण-तरुणींसाठी ड्रग्ज आणि अमली पदार्थ पुरवित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांची मूकसंमती?
शंकरनगर ते रामनगरावरील रस्ता परिसरात फोफावलेल्या पब संस्कृतीला पोलिसांनी पूर्णपणे अभय दिले आहे. आतापर्यंत एकदाही पोलिसांनी साधी दंडात्मक कारवाईसुद्धा केली नाही. या परिसरात मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. उच्चभ्रू वस्तीत बहुमजली इमारतीमध्ये पहाटेपर्यंत पब सुरु असल्यामुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. पबच्या संचालकांचे राजकीय धागेदोरे खूप मजबूत असल्याची माहिती आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
यापूर्वी या परीसरातील पबबाबत वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रारी होत्या. पोलिसांनी नागरिकांनाह होणारा त्रास आणि तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली. या परिसरात पोलिसांची नेहमी नाकाबंदी ठेवण्यात आली आहे. यापुढे कोणतीही तक्रार आल्यास कायदेशिर कारवाई केल्या जाईल. – राहुल मदने, पोलीस उपायुक्त.