मुंबई-गोवा महामार्गाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले. महामार्गाच्या पळस्पे ते माणगाव कामांची पाहाणी केल्यानंतर माणगाव येथे मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.
काही ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होऊ नये यासाठी जिओ पॉलिमर टेक्नो पद्धतीने खड्डे भरले जात असून रॅपिड क्विक हार्डनर, डीएलसी आणि प्रिकास्ट पॅनल पद्धतीचा वापर करून खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी जास्तीत जास्त खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री याआधीच पाहणीसाठी आले असते तर आतापर्यंत काम पूर्ण झाले असते, अशी प्रतिक्रिया कळंबोली येथील सिंधुदुर्ग संघटनेचे पदाधिकारी विष्णू धुरे यांनी दिली. त्याच वेळी स्वत: खाली उतरून खड्डे भरण्याचे काम पाहणारे पहिले मुख्यमंत्री असतील, अशी पावतीही त्यांनी दिली.
सरकारी यंत्रणांची पोलखोल
मुख्यमंत्र्यांचा ताफा पळस्पे फाट्याला पोहचण्यापूर्वी जेएनपीटी ते पळस्पे मार्गावरील खड्डे बघून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्री येणार असल्याने पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सर्वच यंत्रणांनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम रविवारी रात्रीपासून हाती घेतले होते. तरीही खड्डे भरून न निघाल्याने सरकारी यंत्रणेची पोलखोल झाली.
कामचुकार ठेकेदारांची केवळ हकालपट्टी करून किंवा त्यांना काळ्या यादीत टाकून चालणार नाही. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ठेकेदार पैसे घेऊन काम करतात, फुकट काम करत नाहीत. त्यामुळे लोकांच्या जिवाशी खेळ केलेला चालणार नाही.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री