चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कढोली (खुर्द)ग्राम पंचायत सरपंच आणि दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना,त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती.त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी राज्याचे वने,मत्सय व्यवसाय, सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देऊन कोरपना तहसीलदारांनी लावलेली सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच तहसीलदाराचे त्वरित निलंबन करावे,अशी मागणी केली होती. याची शासनाने दखल घेत कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना निलंबित केले आहे.
उपसरपंच डॉ.विनायक डोहे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की,ग्रामपंचायत कढोली (खुर्द) च्या सरपंच सौ.निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सौ.सीता पंधरे,यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले. या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त नागपूर, यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह संबंधितांना देण्यात आले होते.तरीही तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी 19 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीसाठी 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेतली व काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली.अपिलाची मुदत 15 दिवस म्हणजे 27 ऑगस्टपर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेण्यात आली. तहसीलदार कोरपना यांनी आर्थिक व्यवहार करून एकतर्फी आदेश काढून घाई घाईने सभा घेतल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच सदर सरपंच निवड रद्द करावी,अशी मागणी करण्यात आली होती.त्या तक्रारीची दखल घेत कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आवश्यक असललेले EWS व इतर दाखले काढण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला नियम व कायद्याचे डोस पाजणारे,नियमानुसार कामे करण्याचे आव आणणारे तहसीलदार व्हटकर यांनी सदर प्रकरणी नियमांची पायमल्ली केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.