मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून शिफारस करण्यात आली. न्या.नितीन सांबरे मागील दीड वर्षांपासून नागपूर खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांची नेमणूक नागपूर खंडपीठात करण्यात आली होती. न्या.अतुल चांदुरकर यांच्या स्थानावर आलेल्या न्या.नितीन सांबरे यांनी नागपूर तसेच विदर्भातील प्रश्नांबाबत अनेक महत्वपूर्ण दिले. त्यांनी वेळोवेळी शासन, प्रशासन यांची कानउघाडणी देखील केली. अंबाझरीमधील पूरग्रस्तांचा मुद्दा, सिमेंट रस्त्यांचा प्रश्न, महामार्गांची दुरवस्था यासह विदर्भातील रखडलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
कोण आहेत न्या. नितीन सांबरे?
न्या. सांबरे हे मूळचे नागपूरचे असून त्यांचा जन्म १९ डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी सोमलवार हायस्कूल आणि शिवाजी सायन्स कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. १९९२ मध्ये नागपूर येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. एक खेळाडू असल्याने, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. १९९१ मध्ये नागपूर येथील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. २५ ऑगस्ट १९९२ रोजी वकील म्हणून नोंदणी झाली. तत्कालीन ज्येष्ठ वकील शरद ए. बोबडे (माजी सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय) यांच्याकडून वकिली कारकिर्दीला सुरुवात केली. सांबरे २००४-०७ पर्यंत नागपूर येथील हायकोर्ट बार असोसिएशनचे सचिव होते. १ सप्टेंबर २००७ रोजी त्यांची सरकारी वकील नियुक्ती झाली. नागपूर सुधार न्यासाचे वकील, वन विभाग आणि अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष वकील होते. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड इत्यादी सार्वजनिक उपक्रमांचे ते स्थायी वकील होते. विविध महानगरपालिका आणि परिषदा यासारख्या वैधानिक संस्थांचे प्रतिनिधित्व केले. टाटा सन्स, गोदरेज इत्यादी कंपन्यांचे प्रतिनिधित्व देखील केले. ६ जानेवारी २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती. नोव्हेंबर २०२३ पासून ते नागपूर खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.
२१ न्यायमूर्तींची बदलासाठी शिफारस
सर्वोच्च न्यायालयाने एकूण २१ न्यायमूर्तींच्या बदलीसाठी शिफारस केली आहे. यात मुंबई उच्च न्यायालयातून केवळ न्या.नितीन सांबरे यांचे नाव आहे. राजस्थान उच्च न्यायालयात कार्यरत न्या.श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली होईल. न्या.नितीन सांबरे यांच्या कार्यकाळात नागपूरसह विदर्भातील अनेक रखडलेल्या कामांना गती प्राप्त झाली होती. मूळत: नागपूरचे रहिवासी असलेल्या न्या.सांबरे यांनी नागपूरच्या कामाकडे व्यक्तिगतरित्या लक्ष दिले आणि प्रशासनाकडून काम करवून घेतले.