चोरी करायला गेला अन् पाय मोडून बसला : उंच इमारतीवरून कारवर मारली उडी
“करू गेले काय आणि वरती झाले पाय” अशी गंमत एका चोरट्याची झाली. चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या एका चोरट्याने पळून जाताना चक्क दुसऱ्या मजल्यावरून कारवर उडी घेतली मात्र संतुलन गेल्याने तो खाली पडला आणि त्याचा एक पायाच फ्रॅक्चर झाला. चोरीचा प्रयत्न तर सफल झालाच नाही मात्र नुकसान तेवढे झाले. त्यामुळे कुठेच चोरी करायला गेलो असे या चोराला वाटले असेल.
चोरी करण्याच्या इराद्याने एका घरात शिरलेल्या चोराने पळून जाण्याच्या बेतात उंच इमारतीवरून कारवर उडी मारली. यात त्याच्या पायाचे हाड मोडून तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी(दि.४) सकाळी ६.३० ते ७ वाजेच्या सुमारास विदर्भ हाऊसिंग कॉलनी परिसरात मेन रोडवर घडली. रामलाल भोयर (रा. बोरगाव/पहेला) असे चोराचे नाव आहे.
रामलाल नामक हा चोर चोरीच्या उद्देशाने संजय झेलकर यांच्या घरात घुसला. संजय झेलकर ज्या इमारतीत राहतात त्या बहुमजली इमारतीत विविध खासगी कार्यालये आहेत. हा चोर मागच्या बाजूने इमारतीत शिरला. मात्र त्याचा चोरीचा उद्देश असफल ठरला. घरातील मंडळी जागे झाल्याने त्या पळून जाण्यावाचून दुसरा उपाय नव्हता. मात्र, समोरच्या बाजूने घराचे चॅनलगेट बंद असल्याने त्याला बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. त्यामुळे तो या बहुमजली इमारतीच्या एका मजल्यावरून उतरत खालच्या मजल्यावर उतरला.
लोकांच्या हातात सापडल्यास आपल्याला चांगला चोप बसल्या शिवाय राहणार नाही या भितीने त्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून टि-स्टॉल व्यावसायिकाच्या खाली ठेवलेल्या आयटेन कारवर उडी मारली. कारवर उडी मारताच संतुलन बिघडल्याने तो खाली कोसळला यात त्याच्या पायाचे हाड मोडले व गंभीर दुखापत झाली. तर कारचेही नुकसान झाले. दणकण आवाज ऐकुन सभोवतालचे लोक गोळा झाले. तेव्हा हा महाभाग जखमी स्थितीतच भितीने कारखाली जावून घुसला.
लोकांनी चौकशी केली असता, वस्तुस्थिती समोर आली. दरम्यान घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याला कारखालून बाहेर काढले आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. चोरीच्या उद्देश तर सफल झालाच नाही , उलट चोराला पाय मोडून घ्यावा लागला. या घटनेची चर्चा परिसरात रंगली होती.