मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री श्रीमती मधुवंती दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. रु. ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली. मधुवंती दांडेकर यांची संगीत नाटकांमधली कारकीर्द तब्बल ५५ वर्षांची आहे. आज वयाच्या ७२ व्या वर्षीही त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिजात शास्त्रीय व अभिजात मराठी संगीत नाटकांचा वारसा मिळालेल्या मधुवंती दांडेकर यांना गायनाची आवड लहानपणापासून होती. शालेय वयापासूनच त्यांनी गायन व नाट्य स्पर्धांमधून अनेक पारितोषिकं मिळवली होती. स्वरराज छोटा गंधर्व, संगीतभूषण पंडित राम मराठे, पंडित ए.के. अभ्यंकर, पंडित यशवंतबुवा जोशी यांसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गुरूंकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. सुमारे 25 मराठी संगीत नाटकांमधून त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या. तसेच गुजराती व उर्दू नाटकांतूनही त्यांनी काम केले. मधुवंतीताईंनी अनेक नामांकित संस्थांच्या नाटकात ज्येष्ठ कलावंतांबरोबर भूमिका केल्या. मधुवंती आजही संगीत व नाट्यक्षेत्रात मोठ्या उत्साहाने व आस्थेने कार्यरत आहेत. शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्रीमती दांडेकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी श्रीमती फैय्याज, श्री.प्रसाद सावकार, श्रीमती जयमाला शिलेदार, श्री.अरविंद पिळगावकर, श्री.रामदास कामत, श्रीमती कीर्ती शिलेदार, श्रीमती रजनी जोशी, श्री.चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर, श्रीमती निर्मला गोगटे आणि श्री.विनायक थोरात यांना प्रदान करण्यात आला आहे.
Check Also
नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर
राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …
ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …