काळाच्या परडीतून ओघळावा एखादा अलवार क्षण , दवांसारखा…. झेलून धरता यावं त्याला मनाच्या तृणपात्यावर .शप्पथ सांगते…, लिहिन मी कविता त्याच दवभिजल्या क्षणाच्या काळजावर….!
तलम धुक्याच्या शाईने……..
वा कधी काळाच्या कळपातून चुकावी वाट एखाद्या ऊनाड क्षणाने…. हुंदडत हुंंदडत जावं त्यानं दाट, निबिड रानात. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सार्या दिशा हरवून जाव्यात नि मावळावा दिवस त्याचं क्षणी. पसरत चालल्या अंधाराला घाबरून त्याचा जो आर्त आवाज निघेल ना, शप्पथ सांगते,… त्याच हंबरावर लिहिन मी कविता आईच्या मायेनं , दुधावरच्या सायीनं…….
काळाच्या झुल्यावर बसून उंचच उंच झोका चढवावा एखाद्या अल्लड क्षणाने आपल्याचं धुंदीत आभाळाला भिडू पाहणारा अन् उंच चढल्या झुल्यावरून अचानक निसटावा त्याचा हात, अत्युच्य ठिकाणावरून त्याच क्षणी जो चुकेल ना त्याच्या र्हदयाचा ठोका शप्पथ सांगते…, त्याच चुकलेल्या काळजाच्या ठोक्यावर लिहिन मी कविता…
अलवार मोरपिसाच्या लेखणीने…………
एखाद्या क्षणाला लागावी ठेच,
व्हावी जखम जीवघेणी अन्
उमटावी एक अस्फुटशी कळ त्याच्या हृदयातून. ओठावर यावी एक काळीज पिळवटून टाकणारी किंकाळी . शप्पथ सांगते , वेदेनेच्या याच हुंकारावर लिहीन मी कविता स्पंदनातील बासरीच्या स्वर्गीय सुरावटीने…………..
धो धो कोसळावा पाऊस, यावा प्रलय चोहिकडे, व्हावी दलदल सगळीकडे. प्रत्येक चीजेला गिळंकृत करणारी . याचवेळी… सैरावैरा धावत सुटल्या काळाच्या पदरातून सुटून पडावा एखादा क्षण, याच महाकाय दलदलीत. शप्पथ सांगते…, दलदलीतूनही कमळ होऊन फुलण्याच्या त्या क्षणाच्या दुर्दम्य जिद्दीवर लिहिन मी कविता अत्तरात चिंब भिजल्या सुगंधित फायाने……………
काळावर ठसा उमटवणारी….
बस्सं…!
हे क्षण माझ्या हाती लागावेत…..!!
इतकंच……..!!!
उज्वला सुधीर मोरे
वाशीम
9552711968