चंद्रपूर दि.7 सप्टेंबर : कोरोना संसर्गाच्या काळात बाधितांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता असून खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या कार्यात जोडून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर सोनारकर, मुख्य आरोग्य अधिकारी मनपा डॉ. अविष्कार खंडारे, शरीरक्रिया शास्त्र विभागाचे डॉ. अविनाश टेकाडे, प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहेत. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी कोरोना संसर्ग काळात सेवा देण्यासाठी तत्पर रहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.कोविड रुग्णालयातील सेवा देणारे सर्व डॉक्टर्स व नर्स यांची यादी अद्यावत ठेवावी. योग्य ते नियोजन करून शिफ्ट प्रमाणे डॉक्टरांच्या ड्युटी लावाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता बाधितांची गैरसोय होऊ नये यासाठी आयसीयू बेड, ऑक्सीजन बेड, औषधे, साधनसामुग्री पुरविण्यावर प्रशासनाचा भर आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर येथील स्त्री रुग्णालयातील 450 खाटापैकी कोविड रुग्णांकरिता तातडीने 100 सुसज्य खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. तसेच ई-निविदा प्रणालीच्या माध्यमातून मनुष्यबळाची भरती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.