माणिकगड रोडवर उभ्या वाहनांमुळे नारीकांचा जीव टांगणीला.
कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:–
कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे शहर औद्योगिकीकरणामूळे जगप्रसिद्ध असून याठिकाणी इतर समस्यां व्यतिरिक्त वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले असून येथील पोलिस स्टेशनला लागूनच माणिकगड सिमेंट कंपनी गेट समोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विविध मोटार ट्रांस्पोर्ट कंपन्यांची मोठमोठी वाहने उभी असतात.त्यामुळे ये-जा करणाऱ्या विविध वाहनांसह सर्वसाधारण नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आगोदरच या रोडची अवस्था अत्यंत दयनीय आहे,यावर वाहतुकीचा प्रश्न,यामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः टांगनीला लागला आहे.असे असताना स्थानिक पोलिस निव्वळ बघ्याच्या भुमिकेत दिसत आहे.ट्रांस्पोर्टरांसोबत पोलिसांनी स्थापित केलेल्या मधूर संबधांचे हे फलीत असल्याची शंका अनेक जण व्यक्त करताना दिसतात.
बरेचदा विविध माध्यमांद्वारे सदर समस्येवर प्रकाश टाकण्यात आला.मात्र अजुनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली दिसत नाही.ट्रांस्पोर्टरांकडून पोलिसांना लाखोंचे हफ्ते मिळत असल्याने प्रत्येकवेळी थातुरमातुर कारवाई व्यतिरिक्त ठोस असे काहीच घडत नसल्याची चर्चा नागरिकांत सुरू असून याठिकाणी अंदाजे १० पेक्षा जास्त मोटार ट्रांस्पोर्ट कार्यालय अस्तित्वात आहे.आणि प्रत्येकांकडून कमीजास्त ५० गाड्या चालतात.गडचांदूर येथील पेट्रोल पंप चौकापासून माणिकगड कंपनी गेट,रेल्वे गेट पासून विर बाबूराव शेडमाके चौक आणि अंबुजा फाटा या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठी वाहने उभी असल्याने एकीकडे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.तर दुसरीकडे नागरिकांवर जीव मुठीत धरून ये-जा करण्याची नामुष्की ओढावली आहे.जर पोलिसांच्या आशिर्वादाने ट्रांस्पोर्ट चालकांची मनमानी सूरू असेल तर ही बाब अत्यंत गंभीर समजावी लागेल असे मत अनेक सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले असून सदर रस्त्यावर दुतर्फा उभ्या वाहनांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकुणच शहरातील वाहतुक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून कारवाई करणारेच जर याकडे दुर्लक्ष करीत असेल तर नागरिकांनी दाद मागावी कुणाकडे अशी खंत व्यक्त होत आहे.