Breaking News

यवतमाळ :- शेळीपालन व्यवसाय” बनला आदिवासी गावातील महिलांसाठी एटीम मशीन

Advertisements

यवतमाळ ;जिल्हा प्रतिनिधी:- बजाज प्रकल्पामुळे १७० कुटुंब शेळीपालन व्यवसायात यवतमाळ जिल्हयामध्ये झरी तालुक्यातील १० व राळेगाव तालुक्यातील ३ गावामध्ये दिलासा संस्था, घाटंजी अंतर्गत बजाज जलसंधारण प्रकल्प राबविल्या जात आहे. हा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. झरी क्लस्टरमधील प्रकल्पाच्या १० गावातील (९६% लोकसंख्या) व राळेगावमधील ३ गावची (२८% लोकसंख्या) हे आदिवासी क्षेत्र आहे. येथील शेतकरी बहुतांश कोरडवाहू शेती करत असून, बहुतेक लहान जमीनधारक शेतकरी आहेत. या आधी गावातील कुंटुंब शेती व्यवसायावर अवलंबून होते. काही कुटुंब शेती नसल्या कारणाने शेत मजुरीवर उदरनिर्वाह करत होते. शेती व्यतिरिक्त कुठलाही रोजगार उपलब्ध नसणे, शिक्षणाचा अभाव असणे, सिंचनाची अपुरी व्यवस्था, त्यामुळे रोजगाराच्या शोधामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तसेच दसरा दिवाळी नंतर कुटुंब उपजिवेकेकरिता बाहेरगावी जावे लागत असे. इत्यादी कारणामुळे आदिवासी गावातील कुटुंब हलाकीचे जीवन जगत होते. त्यामुळे राळेगांव व झरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील महिलांना पर्यायी उपजीविकेचे साधन मिळावे व त्यांची उपजीविका शाश्वत व्हावी यासाठी बजाज जलसंधारण प्रकल्पा अंतर्गत दिलासा संस्थेच्या मार्गदर्शनातून गावातील महिलांनी पुढाकार घेऊन झरी क्लस्टमध्ये ४३ व राळेगाव क्लस्टर मध्ये ३६ अशा एकूण ७९ स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना केली.
बजाज जलसंधारण प्रकल्पा अंतर्गत स्थापन केलेल्या संयुक्त महिला समितीद्वारा प्रथम गावातील महिला गटाची तपासणी करून बैठकीमध्ये सशक्त गटाची निवड करण्यात आली. त्यानंतर बचत गटाची स्वतंत्र बैठक घेऊन शेळीपालन व्यवसायाकरिता आवश्यक असलेल्या बाबीची तपासणी करून वैयक्तिक महिलेची गटामधून निवड केली. प्रती महिला रु. ५०००/- लोकसहभाग संयुक्त महिला समितीच्या खात्यामध्ये जमा केल्यानंतर, प्रकल्पातून प्रती महिला रु. २०,०००/- सहाय्य अशाप्रकारे दोन्ही क्लस्टर मधील गावामध्ये एकूण रु. ३४,००,०००/- लाख फिरता निधी बचत गटातील महिलांना संयुक्त महिला समितीमार्फत देण्यात आला आहे. आतापर्यंत ११ गावातील एकूण ४९ बचत गटातील १७० कुटूंबानी प्रकल्पामार्फत शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी प्रती महिला ३ ते ४ शेळ्या याप्रमाणे एकूण ६१९ शेळ्या स्वत: महिलांनी शेळ्याची निवड करून खरेदी केल्या असून, त्याच्या पिल्लाची वाढ झाल्यामुळे शेळ्याची संख्या आता ९६३ झाली आहे. प्रती महिला रु. ५०००/- लोकसहभाग याप्रमाणे एकूण १७० महिलांचा एकूण लोकसहभाग रु. ८,५०,०००/- लाख गावनिहाय संयुक्त महिला समितीच्या खात्यामध्ये जमा केले आहे. काही महिलांनी रु. २०,०००/- पेक्षा जास्त किमंतीच्या शेळ्या खरेदी करण्यासाठी जास्तीचा खर्च तसेच बाहेरगावातून शेळ्या खरेदी करतांना जाण्या – येण्याचा व साधन आणण्याचा खर्च स्वत: लाभार्थ्यानी केला आहे.
प्रकल्प अंतर्गत महिलांना शेळीपालन व्यवस्थापनबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून, त्याप्रमाणे निगा राखत असल्याने शेळ्याचे मर्तुकडीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच शेळ्याचा विमा काढण्यात आला आहे. पूर्वी बाजारात जाऊन शेळ्या विकत असल्याने महिलेची गरज लक्षात घेता व्यापारी कमी किंमतीमध्ये शेळ्या मागत होते. परंतु आता प्रकल्पातून गावामध्येच शेळ्याचे वजन मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काटा दिला असून, वजन करून शेळ्याची विक्री करत असल्याने चांगली किंमत येत आहे व जास्त शेळ्या असल्यामुळे गावातच व्यापारी शेळ्या खरेदी करण्यासाठी येत आहे. तसेच शेळ्याची पुढची पिढी चांगली व्हावी याकरिता बीटल, राजस्थानी कोटा, जमुनापरी व उस्मानाबादी या जातीचे जातिवंत बोकड गावामध्ये देण्यात आले असून त्यापासून उत्पादन सुरु झाले आहे. ज्या महिलांना शेळ्या घेण्यासाठी फिरता निधी देण्यात आला आहे त्याची परतफेड केल्यानंतर हा निधी गटातील उर्वरित महिलांना देऊन आणखी शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये वाढ होणार आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात ३० ते ४० हजाराने वाढ झाली असून, गावातच उपजीविकेचे साधन सुरु झाले आहे तसेच गरजेनुसार विक्री करता येत असल्यामुळे शेळीपालन व्यवसाय हा आदीवासी महिलांसाठी एटीम मशीन बनला आहे. अशाप्रकारे बजाज जलसंधारण प्रकल्प अंतर्गत दिलासा संस्थेने शेतीबरोबरच जोड धंदा म्हणून महिलांना शेळीपालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करून त्यांना उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन मिळवून दिले आहे व आदिवासी गावातील कुंटूबाच्या आर्थिक उन्नतीत भर घातली आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *