विश्व भारत ऑनलाईन :
रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही.
यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून पुढचा नंबर आमचा तर नाही ना? अशी विचारणाच केली आहे.
मृत्यूमार्ग?
तीन राज्यांना जोडणारा यवतमाळ अमरावती महामार्ग सध्या मृत्यूमार्ग म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावर असणाऱ्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील तब्बल ३४ शाळेतील विद्यार्थ्यांनी आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे.
प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग
उत्तर व दक्षिण कॉरिडोर जोडण्याच्या हेतूने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील अमरावती जिल्ह्यातील धामणी तालुक्यातील भोकरबर्डी या गावापासून हरिसाल, सिमाडोह, परतवाडा, बडनेरा, नांदगाव खंडेश्वर, नेर, यवतमाळ, उमरीपासून पांढरकवडा तालुक्यातील करंजी पर्यंतहा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. मात्र हा मार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही. या मार्गावर असणाऱ्या ३४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दररोज प्रवास करावा लागतो. त्यांना जीव मुठीत घेऊन घरातून शाळेत जावे लागते. यामुळे अखेर दोन्ही जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील सावरकरनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र पाठवलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्यांवर दररोज प्रवास करताना होत असलेला त्रास आणि भीती याबद्दल व्यथा मांडली आहे.
याच महामार्गावर माझ्या दोन मैत्रिणींनी अपघातात जीव गमावला आहे. अनेक सामान्यांनाही जीव गमवावा लागला आहे. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी मैथिली सांडे या नेर येथील विद्यार्थिनीने केली आहे.