पोषण अभियानातील गट समन्वयकांना 6 महिन्यांपासून वेतन नाही !
()
कोरपना ता.प्र.:-
महिला बालकल्याण पोषण अभियानामध्ये कार्यरत असलेल्या गटसमन्वयकांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याची बाब समोर आली असून याबाबत अजूनही कुठलीच माहिती देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे.गेल्या २ वर्षांपासून बरेच युवकांनी सदर अभियानात मन लावून कामे केली आणि हे कार्य आताही सुरूच आहे.असे असताना यांना अजूनही याचा मोबदला मिळाला नसल्याची खंत व्यक्त होत आहे. पोषण अभियानामध्ये वेगवेगळ्या विभागाची समन्वयक साधने तसेच वेगवेगळ्या माध्यमातुन जनजागृतीपर कार्यक्रम घेणे,डेटा भरणे अशा सर्व कामांची जबाबदारी गट समन्वयक चांगल्या प्रकारे करीत असूनही यांना ६ महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही.६ महिने झाले तर १ महिना,१० महिने झाले तर २ महिने,अशा पद्धतीने यांना वेतन मिळाल्याची बोंब सुरू असून आजघडीला तब्बल ६ महिने लोटूनही वेतन मिळालेले नाही.
परिणामी सर्व गटसमन्वयक हेअक्षरशः कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे. कुठलाही न्याय मिळत नसल्याने आज ही मंडळी रस्त्यावर आलेली आहे.कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली असून राज्य शासनाच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन यांना वेळोवेळी वेतन द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. राज्य शासनाने ठरवल्या प्रमाणेच यांना वेतन मिळावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सर्व गट समन्वयकांनी दिला आहे.