टेमुर्डा बँक दरोड्यातील आंतरराज्यीय टोळी गजाआड
– 1 कोटी 7 लाखाचा दरोडा जप्त
चंद्रपूर-
वरोडा तालुक्यातील टेंमुर्डा येथील महाराष्ट्र बँकेतील दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य दोन आरोपींना उत्तरप्रदेशातील बदायू ककराला गाावातून, तर अन्य तीन आरोपींना चंद्रपूर, गोंदिया येथून जेेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 7 लाख 34 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींचा सहभाग विविध गुन्ह्यात असल्याचे माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी शनिवार, 3 एप्रिल रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
टेंमुर्डा येथील 20 मार्च रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेची खिडकी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला व 6 लाख 88 हजार 130 रुपये रोख व 93.100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 11 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करीत वेगवेगळ्या दिशेने तपासाला सुरुवात केली. 2013 मध्ये असाच प्रकारचा एक गुन्हा माढेळी व तेलंगणा राज्यात घडला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली होती. बँक ऑफ महाराष्ट्र व मागील गुन्ह्याच्या प्रकारात साम्य असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू केला. 26 मार्चला मागील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी देविदास रुपचंद कापगते, राजू वरभे, संकेत उके यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. अटकेतील आरोपींनी उत्तरप्रदेश राज्यातील ककराला टोळीतील सहा जणांसोबत मिळून हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
31 मार्चला मुख्य आरोपी नवाब उल हसन हा हसनपूर येथे साथीदाराला भेटण्याकरिता येणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. या कारवाईत आरोपीसोबत पोलिसांची झटापट झाली, ज्यामध्ये जितेंद्र बोबडे व संदीप कापडे यांना दुखापतसुद्धा झाली. मात्र, 2 आरोपींना अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना बदायु जिल्ह्यातील आलापूर पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्यांनी उत्तरप्रदेश येथे 6, चंद्रपूर जिल्ह्यात 2 व गोंदिया जिल्ह्यात 1 घटनेत सहभाग असल्याची कबुली दिली. आरोपी नवाब उल हसन याच्या घराची चौकशी केली असता, त्याच्या घरातून तब्बल 1 कोटी 7 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना वरोडा पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पुन्हा चौकशी केली असता त्यांनी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात एकूण 11 गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने सर्व आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, तपास पथकातील अधिकारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

टेमुर्डा बँक दरोड्यातील आंतरराज्यीय टोळी गजाआड ,1 कोटी 7 लाखाचा दरोडा जप्त
Advertisements
Advertisements
Advertisements