महाराष्ट्रात लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर
“संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. आपण लॉकडाउन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाउन १०० टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाउनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
देशात पुन्हा कडक लॉकडाउन लागणार का?; अमित शाह म्हणाले…
“करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होतं, लाट सौम्य येईल पण ही लाट तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
“दिल्लीने कडक लॉकडाउन केला असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. लॉकडाउन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दिल्लीच्या लॉकडाउनचं काय स्वरुप आहे? लोकलसंबंधी काय निर्णय घेतला आहे? अत्यावश्यक सेवांना काय सूट दिली आहे? ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर स्वरुप ठरवून नंतर घोषणा करण्याचा आमचा विचार आहे असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
लॉकडाउनसंबंधी अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी करोनाच्या लढाईसाठी ठाकरे सरकारने साडे पाच हजार कोटी रुपये राखीव ठेवले असल्याची माहिती दिली. “कोविड रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करायची असेल किंवा रेमडेसिवीर घ्यायचं असेल, ऑक्सिजन प्लांट लावायचा असेल, बेड्स वाढवायचे असतील या सगळ्यासाठी ३३०० कोटी आणि आमदारांना एक कोटी त्यांच्या निधीतून खर्च करायचा आहे. याशिवाय इतर स्त्रोतही आहेत,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
“केंद्र सरकारने एसडीआरएफमध्ये कोविडसाठी पैसे दिलेले नाहीत. गेल्यावेळी १२०० कोटी रुपये दिले होते. मागच्या वेळी ३ एप्रिलला पैसे आले होते, पण आज १९ एप्रिल असून अद्यापही पैसे आलेले नाहीत. हे टीका म्हणून नाही, पण उशीर झाला आहे. यावर्षी त्यांच्याकडून १६०० कोटी अपेक्षित आहे,” असं त्यांनी सांगितलं.