चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वच खासगी कोव्हिड रुग्णालय लोकवस्तीत आहेत. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खासगी कोव्हिड रुग्णालयांनी लगतचा परिसर स्वच्छ ठेवून नियमित निर्जंतुकीकरण करा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाद्वारे नियमित काळजी घेतली जात आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय शहरातील खासगी कोव्हिड रुग्णालयात रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल होत असतात. बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने रुग्ण बाहेर फिरतात. यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने वस्तीतील लोक सध्या भयभीत होत आहेत.
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे, महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे आवाहन
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे
महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे आवाहन
खासगी कोव्हिड रुग्णालय आतून नियमित स्वच्छ होत असतात. मात्र, सोबतच बाहेरील लगतचा परिसर स्वच्छ ठेवून नियमित निर्जंतुकीकरण करावे, रुग्णालयातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात बसण्याची व्यवस्था करून द्यावी, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.