Breaking News

बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव!

Advertisements
बासाहेबांना अभिप्रेत तरुण वर्ग-अपेक्षा आणि वास्तव!
देशात सध्या सर्व पातळ्यांवर विविध घडामोडी घडत आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिवसागणिक नव-नवीन समीकरणे बनताना व बिघडताना दिसून येत आहेत. या सर्व कार्यक्रमात आपला आंबेडकरवादी तरुण फारसा दिसून येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्त्नांनी व बलिदानांनी, समतेच्या उंबरठ्यावर आणून सोडलेल्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थ भावनेने लढा पुकाराण्यास उभारलेल्या फौजेचे अस्तित्व सध्याच्या काळात धूसर होत चालल्याचे प्रकर्षाने जाणवते. आज बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या समाजातील तरुण वर्ग आहे तरी कुठे?. हा वर्ग सध्या काय करत आहे? त्यांचे प्रेरणास्थान कोण आहेत? त्यांची जीवनातील ध्येय काय आहेत? आपल्या सभोवताली घडत असलेल्या एकंदर घटनांबद्दल आणि घटकांबद्दल त्यांचे काय मत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आज नितांत गरज आहे असे जाणविते. खरं तर आज या संपूर्ण तरुण वर्गास आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तसे पाहता आत्मपरीक्षण ही क्रिया निरंतर सुरु राहायला हवी अन्यथा आपली वाढ खुंटते व आपण आपल्या निश्चित मार्गापासून भटकले जातो. दुःखद अंतःकरणाने असे मांडावे लागत आहे कि आजचा आपला तरुण वर्ग हा बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गापासून भटकला आहे. याच गोष्टीचा फायदा इतरांनी वेळोवेळी उचलला आहे आणि उचलत आहेत.
मला या घडीला वाचकांसाठी एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो, “हे लोक जय भीम वाले आहेत” हे एक साध वाक्य आहे. पण प्रश्न हा आहे कि बौद्धेतर समाज, मग त्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय समाज आणि स्वतःला उच्चवर्णीय समजणार समाज जेव्हा वरील नमूद वाक्य उदगारतो तेव्हा या वाक्यात कोणता भाव असतो??? आदर असतो? प्रेम/सद्भावना असते? द्वेष असतो कि मत्सर असतो? हा प्रश्न आपणास कधी पडला आहे का? आणि जर पडला असेल तर याचे उत्तर काय आहे?.
मला असे वाटते कि बहुतेक लोकांना या प्रश्नाचे उत्तर ठाऊक आहे. आणि हे उत्तर येणास जबाबदार इतर समाजातील लोक नसून सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. हे एक कटू सत्य आहे. ज्याकडे तुम्ही आणि आम्ही पाठ फिरवू शकत नाही. किंबहुना त्याचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. एक प्रकारे जबाबदारीच म्हणा हवे तर. येथे बऱ्याच जणांना माझी मते पटणार नाहीत, आक्षेपार्ह वाटतील,पण मी येथे समाजातील १०% लोकांबद्दल नाही तर ९०% लोकांबद्दल आपले प्रामाणिक मत मांडत आहे.
आपल्या समाजातील बरेच तरुण-तरुणी शिकले, उच्च शिक्षित झाले, मोठे साहेब झाले, नेते झाले, व्यावसायिक सुद्धा झाले, परदेशात स्थायिक झाले, तसे पहिले तर आपण बरीच प्रगति देखील केली. तरीसुद्धा “हे लोक जय भीम वाले आहेत” या वाक्यातील इतरांच्या मनातील भावना बदलल्या आहेत का? आपल्या स्वतःच्या तरी मनातील भावना बदलल्या आहेत का? प्रामाणिक उत्तराची अपेक्षा आहे. आपण कुठे कमी पडतोय हे शोधण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आरक्षणाचा उपयोग करून पुढे गेलेल्या किती टक्के तरुणांनी आपण समाजासाठी काही देणे लागतो या विचाराने विधायक कार्ये केली आहेत?
आज आपला तरुण वर्ग १४ एप्रिल ला भव्य दिव्य मिरवणूक काढणे,वर्गणी गोळा करणे, आंबेडकरी गाण्यांवर डीजे च्या तालावर नाचणे आणि ६ डिसेंबर ला शुभ्र वस्त्र परिधान करून चैत्यभूमी, दीक्षाभूमी अथवा सार्वजनिक चौकातील बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प-हार वाहून आदरांजली देणे हेच आपले बाबासाहेबांप्रती काय ते कर्तव्य आहे. या पोकळ विचारधारेचा भाग बनला आहे. अर्थात याला काही अपवाद आहेत, सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे चुकीचे आहे परंतु वर नमूद केल्याप्रमाणे येथे जनमानसा बाबत मत व्यक्त केले आहे.
बाबासाहेबांइतका ज्ञानासूर्य/ ज्ञानाचा महासागर या पृथ्वीतलावर दुसरा जन्मला नाही, भारतीय राज्यघटना हि आमच्या बाबांची देण आहे, नोकरदार वर्गासाठी ८ तासांचा दिवस, बोनस, महिलांसाठी आरक्षण अशा एक ना अनेक गोष्टींचा अभिमान आजचा तरुण वर्ग बाळगून आहे आणि तो हवा सुद्धा. पण यामधील किती जण बाबासाहेबांच्या शैक्षणिक कारकिर्दीची अचूक माहिती सांगू शकतात? पूर्ण तपशील सोडाच पण बाबासाहेबांनी मिळविलेल्या पदव्यांची आणि विषयांची तरी माहिती सांगू शकतात का? बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके, शोधनिबंधे, प्रबंध, पत्रं आजच्या तरुण वर्गाने वाचली आहेत का? जर याचे उत्तर होकारार्थी असले असते तर कदाचित “हे लोक जय भीम वाले आहेत” या वाक्यास एक वेगळेच तेजोवलय निर्माण झाले असते.
सामाजिक दबावाच्या नावाखाली आजही आपले लोक इतर देवतांच्या धर्मान्ध चालीरीती, रूढी परंपरा पकडून बसला आहे. देव देवस्की, घरचा देव, गावाचा देव करीत अजूनही बरीचशी सुशिक्षित आणि समाजात विशिष्ट स्थान प्राप्त केलेली मंडळी आपल्याला आढळून येते व हे सर्व सोडून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढे जाण्याच्या मनःस्थितीत सध्या तरी ते दिसत नाहीत. आपल्या समाजात असे किती परिवार आहेत जे आपल्या मुलींना- सुनांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेले समान स्थान देऊन त्यांचे मत परिवाराच्या प्रत्येक निर्णयात गृहीत धरतात व त्यांना योग्य ते स्वातंत्र्य देतात?  खरं तर अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या नमूद करता येऊ शकतील परंतु हि वेळ त्याच त्याच मुद्द्यांना धरून चघळत बसण्याची नसून यावर मार्ग काढण्याची आहे.
मग कदाचित एक प्रश्न मनात येईल कि यावर काही तोडगा निघू शकतो का? माझे वैयक्तिक मत आहे कि “होय”. जर का हजारो वर्षे चालत आलेल्या रूढी परंपरांना फुले- आंबेडकरांसारखी व्यक्तिमत्त्वे आवाहन देऊन त्यावर चळवळ उभारून शुद्राती शूद्र संबोधलेल्या समाजास माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देऊ शकतात तर आपण सर्व एकत्र येऊन त्यांनी केलेल्या परिश्रमाच्या २०% जरी कार्य केले तरी बदल अटळ आहे.
बाबासाहेबांनी आपणास राज्यकर्ते व्हा असा सल्ला दिला. काहींनी त्या मार्गावर जाऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली सुद्धा, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित कार्य काही कारणास्तव झालेले दिसून येत नाही. आणि जर का तसे झाले असते तर आज मी हा लेख मुळात लिहिलाच नसता. अशा नेत्यांची इतर समाजातील नेत्यांनी जाणीवपूर्वक रित्या पंख छाटले, अर्थात आपले पंख छाटले जात आहेत हि बाब त्यांच्या लक्षात न येणे हेच त्यांचे अपयश किंबहुना एकंदरीत चळवळीचे अपयश होय. असो, मूळ मुद्द्याकडे वळायचे झाल्यास आज आपल्या समाजातील तरुण वर्गाने काय केले पाहिजे यावर विचारविनिमय काण्याची नितांत गरज आहे. आजच्या काळात आपणास राज्यकर्ते व्हायचे असेल तर आपणास काय करावे लागेल? राजकीय चळवळीत सक्रिय भाग घ्यावा लागेल कि इतर मार्ग शोधावे लागतील?
राजकारणांत सर्वच जण नेते बानू शकत नाहीत, ती कुवत आणि त्यासाठी लागणारे कौशल्य सगळ्यात असतेच असे नाही. मग यावर पर्याय आहे प्रशासकीय सेवेचा. आपल्या समाजातील सर्व तरुण- तरुणींनी  आपला मोर्चा शासकीय सेवेच्या दिशेने वाळवायला हवा. IAS, IPS, IRS, IFS, कायदेतज्ज्ञ, अश्या सर्वात महत्वाच्या पदांवर जास्तीत जास्त तरुण तरुणी पोहोचली पाहिजेत. शासनातील क्लास १ ते ४ मधील सर्व पदांवर आपल्या तरुणांनी मेरिट च्या बळावर, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळवून निवडून गेले पाहिजे.
आज जर का आपणास कोणी विचारले कि भारतातील सर्वात हुशार विद्यार्थी कुठे शिक्षण घेतात तर त्याचे उत्तर असते IIT, IIM, IISC, JNU. या शैक्षणिक संस्थांमधून निघालेले विद्यार्थी हे जागतिक व्यापारी वर्गाची पहिली पसंत असतात, त्यांना उत्तम पगार मिळतो. आपल्या तरुण वर्गाने अशा नामांकित शिक्षण संस्थांमध्ये निवड कशी होईल या दिशेने स्वतःला झोकून दिले पाहिजे. आपली मुलं डॉक्टर झाली पाहिजेत सध्याची जागतिक महामारीमध्ये होत असलेला बाजार, लोकांची फसवणूक आपण पाहिली अथवा अनुभवलीही असेल मग जर का आपल्या घरातील मुलं डॉक्टर असली तर हि फसवा फसवी शक्य होईल का? काही जण म्हणतील कि हाताची सर्वच बोटे सामान नसतात, सर्वांना उच्च शिक्षण घेणे शक्य नाही, नसुदे, मग काही मुलं व्यापारात आपले  नाव प्रस्थापित करू शकतील, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून विक्रमी उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित करू शकतील. जर अशा प्रकारे आपल्या तरुण वर्गाने वाटचाल करायचे निश्चित केले तर आपल्याला राज्यकर्ते होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. बाबासाहेबांनी फार प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले, ते पण काही तुमच्या आमच्यासारखेच सोन्या चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नव्हते, त्यांनी ज्या हाल- अपेष्टांना सामोरे जाऊन आपले व्यक्तिमत्त्व उभे केले त्याची तर आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. आज आपल्याकडे त्यांच्या काळात उपलब्ध नसलेले बरीच साधनं उपलब्ध आहेत ज्यांचा पुरेपूर वापर करणे अपेक्षित आहे.
परंतु या क्षणाला मला असे वाटते कि आपणास आधी हे शोधावे लागेल कि खरंच आपल्या समाजातील तरुण वर्गाची ध्येय काय आहेत आणि त्यांचे प्रेरणास्थान कोण आहेत? आणि मुळात त्यांना या लेखात मांडलेल्या विचारांमध्ये तथ्य आढळते का? जर यांची उत्तरे सकारात्मक असली तरच हे विचार पुढे नेण्यात शहाणपण आहे अथवा असे लिखाण करणारे आणि भाषणे देणारे अनेक विद्वान आपल्याला चौका चौकात सापडतील.
आपला अभिप्राय कळावा. जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तसा उद्देश मुळीच नाही हे लक्षात घ्यावे व क्षमा करावी.
 
प्रतिक प्रिया प्रकाश तांबे (M.Sc.,M.Phil.),Mob- 9579764604,
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *