साहेब,विज वसुली १०० टक्के मग विज पुरवठा १०० टक्के का
नाही ?
(“उर्जामंत्र्यांना” संतप्त सवाल ? विजेच्या लपंडाव नागरिकांच्या जिव्हारी.)
कोरपना(ता.प्र.)
गडचांदूर महावितरण विभागच्या गलथान कारभाराने डोकेदुखी वाढली असून सतत विजेच्या लपंडावमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाल्याचे चित्र आहे.दिवसरात्र कितीदा विज पुरवठा खंडीत होतो हे सांगणे सध्या कठीण झाले असून महावितरणाच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे.याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत असून बिलांची वसूली १०० टक्के पाहिजे मग वीज पुरवठा १०० टक्के का नाही ? असा संताप सवाल अनेक त्रस्त विज ग्राहकांनी “दै.चंद्रधून” च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या “उर्जामंत्र्यांना” विचारले आहे.अखेर किती दिवस भोगायची ही नरकयातना अशी भावना व्यक्त होत असून एकीकडे विजेच्या समस्यांमुळे नागरिक हैराण असताना दुसरीकडे गडचांदूर महावितरणचे अधिकारी कोरोनाच्या नावाखाली निव्वळ बघ्यांची भुमिका वळवत असल्याचे आरोप होत आहे.
विज पुरवठा व्यवस्थितरीत्या होत नसल्याने अनेक विद्युत उपकरणे शोभेच्या वस्तू बनल्या आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लावले. “घरी रहा, सुरक्षित रहा” असे आवाहन करण्यात येत आहे. त्यावर मे महिन्याची जीवघेणी उष्णता व दिवसरात्र सूरू असलेला विजेचा लपंडाव नागरिकांना अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत काय करावे काय नाही ! हेच समजेनासे झाले असून अखेर “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” कुठपर्यंत सहन करायचा अशी जळजळीत भावना अनेकांकडून व्यक्त केली आहे.शहरापेक्षा खेड्यापाड्यात तर विचारूच नका.याठिकाणी विजेच्या समस्येने शिखर गाठले आहे.सतत विजेच्या लपंडावामुळे गावकरी कमालीचे त्रस्त असून सध्या मे महिना सुरू असल्याने वातावरणात कमालीची उष्णता जाणवत आहे.जीवाची लाहीलाही होत असून महावितरण अधिकाऱ्यांनी परिसरातील खेड्यापाड्यात सतत खंडित होत असलेला विज पुरवठा त्वरित कायमस्वरूपी सुरळीत करावा,अन्यथा गाववासीयांकडून भविष्यात मोठे जनआंदोलन उभारण्याचे संकेत मिळत आहे.संबंधीत विभाग अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देऊन शहर व परिसरातील खेड्यापाड्यांची विजेच्या समस्येतून सुटका करावी अशी मागणी वजा विनंती अनेक त्रस्त ग्राहकांनी केली आहे.