प्रज्ञा शील करुणा असे बहुसंख्य महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्ध म्हणतात.पण त्याचा अर्थ माहिती असून ही आचरणात आणत नाही.आचरणात शील नसेल तर समाधी कशी लागेल.आणि समाधी लागलीच नाही तर प्रज्ञा म्हणजे ज्ञान कसे प्राप्त होईल.वाचण्यासाठी लिहण्यासाठी प्रथम शिकावे लागते,बाराखडी पाठ असली पाहिजे तरच एका एका अक्षरांना जोडून शब्द तयार करता येतात.मग त्या शब्दात अर्थ प्राप्त होतील अशी रचना तयार करावी लागते.हे जो पर्यत स्वता शिकून घेत नाही तो पर्यत ती आत्मसात होत नाही.यापद्धतीने शील,समाधी आणि प्रज्ञा शिकून घ्यावी लागते.नंतर तिचे आचरणात आणावी लागते.तथागत बुद्धांनी अखंड मानव कल्याणासाठी मानवाला दुःख मुक्त करण्याचासाठी शील,समाधी आणि प्रज्ञा आत्मसात करून घेण्याचे सांगितले होते.तेव्हाच बहुजन हिताय बहुजन सुखाय हा महामार्ग यशस्वीपणे मानव कल्याण आणि विकास करेल.
कोशल देशात शाक्य कुलात गौतम बुद्धाचा जन्म वैशाखी पौर्णिमेस झाला. त्याचा पिता शुद्धोदन हा एका लहानशा महाजनसत्ताक राज्याचा राजा होता. त्याच्या आईचे नाव मायादेवी. ही आपल्या घरून माहेरी जात असता वाटेत लुंबिनी उद्यानात प्रसूत झाली अशी आख्यायिका आहे. हे लुंबिनी ठिकाण नेपाळच्या तराई भागात आहे. ह्या ठिकाणास सम्राट अशोकाने भेट देऊन त्या ठिकाणी दगडी स्तंभ उभारून त्याच्यावर लेख कोरला आहे. गौतम बुद्धाचा जन्म झाल्यानंतर आठ दिवसांत त्याची आई मायादेवी ही निवर्तली व त्याचे पालन-पोषण त्याची मावशी व सापत्नमाता महाप्रजापती गौतमी (गोतमी) हिने केले. त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले होते. गौतम बुद्धाचे चरित्र संपूर्णपणे सांगणारा असा ग्रंथ पाली किंवा संस्कृत भाषेत नाही. पाली ग्रंथात जातककथा प्रास्ताविक भागात (निदान-कथेत) तशा प्रकारच्या प्रयत्नास सुरुवात झालेली दिसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म भारतीय लोकांना दिला.त्याचे वाचन आम्ही भारतीय बौद्ध दरवर्षी वर्षावासात म्हणजेच पावसाळ्यातील तीन महिने वाचन करीत असतो.त्यातून आम्ही नियमितपणे विचारतो. शील,समाधी आणि प्रज्ञा म्हणजे काय?.
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना,इच्छा,आसक्ती,आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत. दुःख- मानवी जीवन हे दुःखमय आहे.तृष्णा- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे. दुःख निरोध- दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.प्रतिपद्- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्या साठी हा “अष्टांग मार्ग“ किंवा “मध्यम मार्ग“ सांगितला होता. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग आहे. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ज्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अश्या आहेत. १) सम्यक् दृष्टी – निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. २) सम्यक् संकल्प- म्हणजे योग्य निर्धार, विचार. ३) सम्यक् वाचा- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे. ४) सम्यक् कर्मान्त- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे. ५) सम्यक् आजीविका- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. ६) सम्यक् व्यायाम- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. ७) सम्यक् स्मृती – तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे. ८) सम्यक् समाधी – कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.धम्माची तीन अंग खूप महत्वाचे आहेत.शील म्हणजे काय?. धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत– मातावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्त्व स्वीकारीत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुख तिच्यामागे कधी तिची साथ न सोडणारी तिच्या सावलीसारखे राहते त्यालच शील म्हणतात.
समाधी म्हणजे काय ?.शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचारापासून वाचू शकतो व सदाचरणाकडे वळू शकतो. ह्यासाठी समाधी महत्त्वाची. आपल्या मनाला वश करण्यासाठी बुद्धाने सार्वत्रिक उपाय सांगितला. येणाऱ्या,जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात. प्रज्ञा म्हणजे काय ?.सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणती ना कोणती संवेदना मिळू लागते. नंतर ती साऱ्या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.
शील,समाधी आणि प्रज्ञा धम्माची तीन अंग खूप महत्वाचे आहेत.ज्या मानवानी आणि ते एकत्र राहणाऱ्यां देशांनी खूप प्रगती केली.आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक कला,क्रिडा सर्व क्षेत्रात त्यांनी कल्याणकारी विकासाची झेप घेतली.मानवाला कल्याणकारी विकास करायचा असेल तर त्यांनी संघटितपणे राहिले पाहिजे.उद्या उद्धभवणारी समस्या आजच कशी सोडविली पाहिजे.यावर जे लोक चर्चा करीत होते.ते म्हणजे वज्जी लोक होते.बुद्ध म्हणतात जोपर्यंत वज्जी अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल,ऱ्हास होणार नाही.जोपर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्या प्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही. जोपर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्व परंपरेने ठरविलेल्या कायद्याप्रमाणे वागतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही. जोपर्यंत वडिलधाऱ्या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.जोपर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्याचा चैत्यांचा गौरव करतील व सर्व धम्म कर्तव्ये पार पाडतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.बुद्ध म्हणतात संघ बडा बलवान,संघ सर्वांची रक्षा करू शकतो.म्हणूनच प्रत्येक मानवाने संघटीत पणे राहले पाहिजे.त्यांचा संघ बनविला पाहिजे.संघाच्या नियमाचे पालन केले पाहिजे.युद्ध नको बुद्ध हवा असे आपण म्हणतो पण घराघरातील कुटुंबात आणि संस्था,संघटना यांच्या मध्ये आज युद्धा सारखी परिस्थिती आहे. त्याला कारण प्रथम शील,समाधी आणि प्रज्ञा नसणे हेच मुख्य करणे आहेत.म्हणूनच प्रत्येक मानवानी शील,समाधी आणि प्रज्ञा संपन्न असावे तरच आपण मानव,अखंड मानवाचे कल्याण आणि विकास करू शकतो.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई